‘हवामान बदलाचे संकट आपल्यासमोर उभे असताना ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून केलेली वृक्षारोपण , घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामे कौतुकास्पद आहेत. ‘माझी वसुंधरा’ हे अभियान नाही तर लोकचळवळ झाली पाहिजे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
‘पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माझी वसुंधरा अभियानाला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त आहे. भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी जनसामान्यांच्या मदतीने हाती घेतलेले हे ईश्वरी कार्य आहे,’ असे उद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले. रासायनिक शेती, पर्यावरणीय बदल आरोग्यासाठी घातक असून, या अभियानाची कृषी क्षेत्राशी सांगड घालण्याची गरज अधोरेखित करून नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करण्याचे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले.
वरळी एनएससीआय डोम येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी माझी वसुंधरा मिशन ४.० आणि ५.० अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणासाठी शासन स्तरावर पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणात आणि प्रभावी पद्धतीने मोहीम राबविल्याबद्दल पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचे राज्यपाल देवव्रत यांनी अभिनंदन केले. ‘निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करणे हे जीवसृष्टीसाठी महत्त्वाचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य हे ईश्वरीय सेवा आहे,’ असेही राज्यपालांनी या वेळी सांगितले.
पर्यावरण रक्षणासाठी राज्यपालांनी यावेळी पंचसूत्री मांडली. पर्यावरणाचे संवर्धन विकास धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवून, प्रत्येक विकास प्रकल्पात ‘ग्रीन ऑडिट’ अनिवार्य करावे. स्थानिक पातळीवर हरित अर्थव्यवस्थेला चालना देऊन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी ‘ग्रीन बजेट’ तयार करावे आणि कचरा व्यवस्थापन , सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नैसर्गिक शेतीला आर्थिक प्रोत्साहन द्यावे. पर्यावरण शिक्षणास प्रोत्साहन देऊन, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जनसहभागाला चळवळीचे स्वरूप द्यावे आणि प्रत्येक नागरिक ‘क्लायमेट वॉरियर’ बनावा, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रणाची रिअल-टाइम पाहणी व्यवस्था निर्माण करावी, ‘माझी वसुंधरा’ अभियान हे ध्येय म्हणून स्वीकारल्यास नक्कीच अपेक्षित बदल घडेल,’ असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
‘माझी वसुंधरा अभियानामुळे पर्यावरण संरक्षण हा विषय प्रत्यक्ष कृतीत उतरला. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात शाश्वततेची पायाभरणी होत आहे. जैविक शेती ही अभियान पुढच्या टप्प्यात राबविण्यात येणार असून नैसर्गिक शेतीचा अवलंब करून सुपीक जमीन, शुद्ध पाणी आणि हवेसाठी पर्यावरणरक्षणाचा संकल्प करावा,’ असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.



