गेल्या महिन्यात दूधखरेदीत झालेल्या चार रुपयांच्या वाढीमुळे येत्या एक मार्चपासून गाय व म्हशीच्या दूध विक्री दरांत प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना दोन रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या संदर्भात दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने शनिवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेतला.
दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची कात्रजच्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात सहकारी व खासगी दूध संघाचे २५ प्रतिनिधी उपस्थित होते. या संदर्भात संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि सचिव प्रकाश कुतवळ यांनी माहिती दिली.
गेल्या महिनाभरात दूधखरेदीत चार रुपयांची वाढ झाली. मार्केटमधील पिशवीचे विक्री दर वाढविणे अनिवार्य आहे. त्यामुळे एक मार्चपासून गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी दर वाढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. उपपदार्थाची दरवाढ ही त्या अनुषंगाने होणार आहे. खरेदीची चार रुपये दरवाढ असताना संस्थापातळीवर एक आणि वितरकाच्या कमिशनमध्ये एक असे दोन रुपये सहन करून ग्राहकास केवळ दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दूध व पनीर, तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीवर लक्ष केंद्रित करण्याचे काम सुरू केले आहे. नजीकच्या काळात दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या वतीने अन्न व औषध आयुक्त; तसेच दुग्धविकासमंत्री आणि अन्न व औषधमंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.



