उलगडला अपरिचित इतिहास

Contributed byहेमंत साटमhemant.satam@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वर्सोवा आणि मढचा ३००-४०० वर्षांचा इतिहास आता एका कॉफी टेबलबुकमधून समोर आला आहे. या पुस्तकात जुनी आणि नवी छायाचित्रे आहेत. कोळी समाजाचे आद्यस्थान असलेल्या वर्सोव्याचा बदलता चेहरा यात दिसतो. पोर्तुगीज, मराठा आणि ब्रिटिश साम्राज्यातून गेलेला वर्सोवा आज पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम अनुभवतो. पुस्तकातून वर्सोव्याचे पूर्वीचे नाव 'विसावा' असल्याचे समजते. फिल्मालय स्टुडिओचीही माहिती यात आहे.

unique history of versova new insights unveiled in once upon a shoreline book

बे, नारळासह गर्द झाडी, ताजे मासे, निसर्गाने भरभरून दिलेले दान, संस्कृतींचा मिलाफ, खाद्यसंस्कृती, वैविध्य असे वर्सोव्याचे रूप अजूनही आमच्या डोळ्यांसमोर तसेच आहे. वर्सोवा आता बदलत चालले आहे. इथल्या पिढ्यांचा इतिहास ३०० ते ४००वर्षांपूर्वीचा आहे. इथल्या मातीशी आम्ही एकरूप झालो आहोत’, असे उद्गार वर्सोव्यातील स्थानिकांच्या मनाचा ठाव घेणारे आहेत. एकाअर्थी मुंबईतील संस्कृतीपासून अलिप्त राहत स्वत:चा अधिवास जपणाऱ्या मूळ मुंबईची ओळख असणाऱ्या वर्सोवासोबत मढची ओळख काही अंशी आजही तशीच आहे. हा सारा अनोखा, काहीसा अपरिचित इतिहास ‘वर्सोवा... वन्स अपॉन अ शोअरलान’ या विशेष कॉफी टेबलबुकमधून उलगडला आहे. जुन्या आणि नव्या छायाचित्रांची अविस्मरणीय अशी जोड मिळाल्याने हा दस्ताऐवज पूर्ण झाला आहे.

मुंबईचा कायापालट होत असतानाच वर्सोव्याचे बाह्यरंगही बदलत गेले. कोळी समाजाचे आद्यस्थान असणारा वर्सोवा आता सागरी किनारा मार्ग प्रकल्प, नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प यांसाठी चर्चेत आहे. मुंबईच्या प्रचंड गर्दीत शांतता अनुभवता येणाऱ्या भागात वर्सोवा, मढचा समावेश होतो. पोर्तुगीजांच्या ताब्यातून मराठा आणि त्यानंतर ब्रिटीश साम्राज्यात विलय पावलेला वर्सोवा आज पारंपरिक आणि आधुनिकता यांचा संगम अनुभवत आहे. मूळ मुंबईचा भाग असणाऱ्या वर्सोव्याचा इतिहास पुस्तकरूपात कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ही कमतरता वर्सोवा कॉफीटेबल बुकने भरून काढली आहे. वर्सोवा परिसरात बांधकाम क्षेत्रात प्रवेश करताना व्हॉइसरॉय प्रॉपर्टीजचे सायरस मोदी यांनी वर्सोव्याचा मूळ इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. लिखित इतिहासाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याविषयी फार माहिती नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा, त्यांनी वर्सोव्याचा इतिहास पुस्तक रूपात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अभ्यास करताना त्याची संपूर्ण माहिती, नकाशे, इतिहास यांचा आधार घेत पुस्तकाची निर्मिती केली. या प्रक्रियेसाठी त्यांना साधारण सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागला.

वर्सोव्याचा दस्तवेज करण्यासाठी घेतलेल्या सांघिक परिश्रमातून हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकासाठी लेखन रोहन सबरवाल यांनी केले असून, छपाई पेंटाग्राम प्रिंटर्स यांची आहे. संपादन सेरेना पेस यांचे आहे. पुस्तकाचे डिझाइन ‘लोकल’ ग्रुपचे आहे. प्रख्यात छायाचित्रकार सुनील सिप्पी यांच्या छायाचित्रांची जोड त्यास आहे. स्थानिक रहिवासी भगवान भांजी यांच्याकडील जुन्या छायाचित्रे पुस्तक अधिक समृद्ध करतात. नुकतेच त्याचे प्रकाशन व्हीजे, अभिनेत्री मारिया गोरेट्टी यांच्या हस्ते झाले.

पुस्तकाचा दर्जा जपताना त्यातील साहित्य, छायाचित्र, मांडणी, सादरीकरणवर विशेष लक्ष दिले आहे. त्यातूनच वर्सोव्याचे पूर्वीचे नाव ‘विसावा’ असे होते, अशी माहिती मिळते. कोळी समाज, ईस्ट इंडियन समाज, कोळी ख्रिश्चन आदींचे वास्तव्य असलेले वर्सोवा कसे बदलत गेले हे पुस्तकातून दिसते. त्यात जुन्या छायाचित्रांत ख्रिश्चन कोळी समाजातील लग्नसोहळा, स्वातंत्र्ययुद्धात स्थानिकांचा सहभाग, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पितामह दादाभाई नौरोजी यांच्या घरांपासून वेगवेगळे संदर्भ येतात.

वर्सोव्याचे निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, मासेमारी, किनाऱ्यांवर सुकवण्यात येणारे मासे, खाद्यसंस्कृती यांचे प्रतिबिंब पुस्तकात उमटले आहे. खाद्यसंस्कृतीची विविधताही वेगळ्या पद्धतीने टिपली आहे. यासह, बॉलिवूडमध्ये महत्त्वाचे स्थान राहिलेल्या फिल्मालय स्टुडिओचीही मनोरंजक माहिती आहे. फिल्मालय स्टुडिओचे मालक शशधर मुखर्जी यांनी स्टुडिओसाठी वर्सोव्याची निवड केली. त्यावेळी तिथे जंगल होते, अशी आठवण सांगितले जाते. याच स्टुडिओत राजेश खन्ना, संजीव कुमार, अमिताभ बच्चन असे अनेक बडे कलाकार येत असत, अशी आठवण शशधर मुखर्जी यांचे नातू सम्राट मुखर्जी सांगतात.