ईडी-ममता संघर्ष तीव्र

महाराष्ट्र टाइम्स

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्यातील संघर्ष वाढला आहे. ईडीने तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीकार प्रतीक जैन यांच्यावर छापे टाकले. या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे मोर्चा काढला. त्यांनी ईडी आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. या प्रकरणी न्यायालयात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पोलिसांनी ईडीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

ईडी-ममता संघर्ष तीव्र
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार आणि ‘आयपॅक’चे प्रमुख प्रतीक जैन यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) केलेल्या छापेमारीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ईडी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ईडीच्या कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले, ज्यातून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकार आणि ईडीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने प्रतीक जैन यांच्या निवासस्थानासह ‘आयपॅक’च्या कार्यालयावर आणि इतर १० ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.

दक्षिण कोलकात्यात काढण्यात आलेल्या या मोर्चात तृणमूल काँग्रेसचे आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. बंगाली अस्मितेला अधोरेखित करणारी गाणी, शंखनाद आणि घोषणाबाजी करत तृणमूलने आपली ताकद दाखवून दिली. सुमारे दहा किलोमीटर लांबीचा हा मोर्चा एका जाहीर सभेने संपला. तृणमूल काँग्रेसने राज्यभरात असेच मोर्चे काढण्याचे संकेत दिले आहेत.
या प्रकरणी आता न्यायालयातही दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. ईडीने ममता बॅनर्जी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करत कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ईडीच्या मते, ममता बॅनर्जी यांनी कारवाईत अडथळा आणला. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसनेही ईडीने जप्त केलेल्या कागदपत्रांच्या गैरवापरावर निर्बंध घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात केली आहे. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी १४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, कारण न्यायालयातील गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती.

ममता बॅनर्जी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ईडीविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. कोलकाता आणि बिधाननगर पोलिसांनी हे गुन्हे नोंदवले असून, धमकावणे, चोरी, घुसखोरी, डिजिटल डेटा मिळवणे आणि नुकसान करणे यांसारख्या आरोपांची चौकशी सुरू आहे. ममता बॅनर्जी यांनी ईडीवर भाजपचे राजकीय हत्यार म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, ईडीच्या छाप्यांमागे विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसची रणनीती चोरण्याचा हेतू होता.

मोर्चानंतर घेतलेल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी ईडी आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, "ईडीने पहाटे ६ वाजता छापेमारी सुरू केली. मी तिथे ११.४५ वाजता पोहोचले. तोपर्यंत त्यांनी अनेक गोष्टींची चोरी केली असावी." त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन करत म्हटले की, "मी जे काही केले ते पक्षप्रमुख म्हणून योग्यच होते." ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, सरकारने ईडीसह सर्व संस्थांवर नियंत्रण मिळवले आहे आणि भाजपने अनेक राज्यांमध्ये बळजबरीने सत्ता काबीज केली आहे.