‘विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, यासाठी आम्ही त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारतो. पुण्यात दर वर्षी सुमारे एक हजार विद्यार्थी परीक्षेला बसतात, त्यातून ३० ते ६० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना आठवड्याला १० ते १५ तासांचे विनामूल्य प्रशिक्षण, ऑनलाइन क्लासेस; तसेच वीकएंडला कॉग्निझंट कार्यालयात मार्गदर्शन दिले जाते. ‘एनएमएमएस’, ‘एनटीएसई’सारख्या परीक्षांशी सुसंगत अभ्यासक्रमासोबतच लॅपटॉप, पुस्तके, डिजिटल साधने पुरवली जातात. अकरावी-बारावीसाठी नामांकित कोचिंग संस्थांच्या माध्यमातून ‘जेईई’सह संपूर्ण तयारीचा खर्च उचलला जातो. इंजिनिअरिंगला प्रवेश, कॉलेज शुल्क, होस्टेल, इंटर्नशिप आणि नोकरी मिळेपर्यंत आयटीयन्सकडून वैयक्तिक मेंटरिंग केले जाते,’ असे अभिजित दातार यांनी सांगितले.
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘आयआयटी’पर्यंत पोहोचणे हे स्वप्न असते; मात्र पुण्यातील ‘आयटीयन्स’च्या पुढाकारामुळे हे स्वप्न वास्तवात उतरत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ‘आयटीयन्स’कडून शालेय स्तरापासून राबवला जाणारा ‘प्रोजेक्ट ध्येय’ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचा आयआयटी आणि त्यानंतर प्लेसमेंटपर्यंतचा प्रवास साध्य करून देत आहे.
आपल्या पाल्याच्या आयआयटी प्रवेशावेळी अभिजित दातार यांना आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील मुले प्रवेशासाठी धडपड करतांना दिसली. कोणतेही विशेष पाठबळ नसतांनाही ही मुले आयआयटी किंवा चांगल्या इंजिनीअरिंग कॉलेजसाठी प्रयत्न करतात. मात्र, पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने, करिअरच्या बाबतीत ही मुळे मागे पडतात. ही बाब लक्षात आल्यानंतर, दातार यांनी कॉग्निझंट कंपनीतील निवडक आयटी कर्मचाऱ्यांसह ‘प्रोजेक्ट ध्येय’ सुरू केला. या उपक्रमातून आठवीतील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे निवडून, त्यांचे करिअर ‘सेट’ होईपर्यत विनामूल्य मेंटरिंग दिले जात आहे.
‘या प्रकल्पात ५० टक्क्यांहून अधिक मुली असून, अनेकांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिप आणि प्री-प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत. कंपनीच्या २५०वर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या १० हजार तासांच्या स्वयंसेवेने हा उपक्रम उभा आहे,’ असे ‘कॉग्निझंट’चे आयओटी अँड इंजिनीअरिंग विभागाचे ग्लोबल डिलिव्हरी हेड अभिजित दातार यांनी सांगितले.


