सजना-निकोलाचा प्रतिकार

Contributed byम. टा. क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला १५५ धावांचे लक्ष्य दिले. संजीवन सजनाने २५ चेंडूत ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. निकोला कॅरीनेही ४० धावांचे योगदान दिले. बेंगळुरूकडून नादिन डी क्लर्कने चार बळी घेतले. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

सजना-निकोलाचा प्रतिकार

मनसोक्त फलंदाजी करायची, असे मुंबई इंडियन्सच्या संजीवन सजना हिने बहुदा मैदानात पाऊल टाकण्याआधीच ठरवले होते. सामन्याआधी गायक हनी सिंग याच्या गायनावर तिने खास ठेका धरला होता. हाच जोश फलंदाजीतही दाखवत सजना हिने २५ चेंडूंत १ षटकार आणि सात चौकारांसह ४५ धावा तडकावल्या. यामुळे महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) टी-२० स्पर्धेच्या सलामीला मुंबई इंडियन्सने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूपुढे १५५ धावांचे आव्हान ठेवले.

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 'बेंगळुरू' संघाने मुंबई इंडियन्सच्या धावांवर बऱ्यापैकी अंकुश ठेवला होता. मात्र सलामीला आलेली गुनालन कमलिनी हिने फटकेबाजीस सुरुवात करत पाच चौकारांसह २८ चेंडूंत ३२ धावा तडकावल्या. हरमनप्रीत कौरने सुरुवात बचावाने केले, मात्र दीर्घ खेळी करण्यात ती अपयशी ठरली. ४ बाद ६७ अशा बिकट परिस्थितीतून निकोला कॅरी (४०) आणि ३१ वर्षीय सजना यांनी मुंबई इंडियन्सला सावरले. या दोघींनी ४९ चेंडू केलेली ८२ धावांची भागीदारी डावाला कळस चढविणारी होती. यामुळे अखेरच्या पाच षटकांत १०.८०च्या सरासरीने २ फलंदाजांच्या मोबदल्यात ५४ धावा वसूल झाल्या. 'बेंगळुरू'कडून नादिन डी क्लर्कने २६ धावांत ४ विकेट्स टिपल्या. तर लॉरेन बेल आणि श्रेयांका पाटीलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

स्कोअरबोर्ड : मुंबई इंडियन्स ६ बाद १५४ (अमेलिया केर ४, गुनालन कमलिनी ३२- २८ चेंडूंत ५ चौकार, नॅट शायव्हर ब्रंट ४, हरमनप्रीत कौर २० - १७ चेंडूंत १ चौकार आणि १ षटकार, निकोला कॅरी ४० - २९ चेंडूंत ४ चौकार, संजीवन सजना ४५ - २५ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकार; नादिन डी क्लर्क ४-०-२६-४) वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू .