छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्या दिसल्याचा घटना घडत असून, बिबट्याचे बछडे पाळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करा; अन्यथा त्यांना पाळण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. तालुक्यातील शेंदूरवादा, सावखेडा, दहेगाव बंगला, अगर कानडगाव, जामगाव, गळनिंब, तांदूळवाडी, कोळघर, नेवरगाव, बाबरगाव आदी गावांच्या शिवारात बिबट्यांचा संचार वाढला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांची पिल्ले पाळण्याबाबत सरकारने अभ्यास करावा, लहानपणापासून मानवी सहवासात राहिल्यास प्राणी हिंस्र होणार नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.





