खेडकरच्या बंगल्यातदरोडा; एकास अटक

महाराष्ट्र टाइम्स

पुण्यातील औंध येथील पूजा खेडकरच्या बंगल्यात दरोडा पडला. चोरांनी बंगल्यातील नोकराच्या मदतीने खेडकर कुटुंबियांना गुंगीचे औषध दिले. कपाटातील मौल्यवान वस्तूंची चोरी झाली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंचा शोध घेतला जात आहे.

robbery at khedkars bungalow one arrested
पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या औंध येथील बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीतील एकाला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. खम्मो वीरबहादूर शाही (वय ४०, रा. ठाणे, मूळ रा. कोडनाली, नेपाळ) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेत बंगल्यातील नोकर हिकमत शाही आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेत, नोकराने पूजा खेडकर यांना दोरीने बांधले आणि इतर सदस्यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर कपाटातील मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना ११ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. बंगल्यातील नोकरानेच पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले. त्याचबरोबर, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर, चालक, स्वयंपाकी आणि सुरक्षारक्षक यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले. यानंतर, चोरट्यांनी कपाटातील मौल्यवान वस्तू आणि दागिने लंपास केले. या प्रकरणी पूजा खेडकर यांनी चतुःश्रृंगी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत खम्मो शाहीला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील झोरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, "कोणत्या मौल्यवान वस्तू, दागिने व रोकड चोरीला गेली, याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपी हिकमत शाहीला पोलिस कोठडी सुनावण्यात यावी." या युक्तिवादावर न्यायालयाने आरोपीला १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेत आणखी कोणकोण सामील आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. चोरीला गेलेल्या वस्तूंचा तपशीलही लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.