बुलढाणा जिल्ह्यातील बोदेगावातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घातल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार धाड पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
बुलढाणा तालुक्यात व धाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बोदेगाव येथील रहिवासी भाऊसाहेब पंडितराव दांडगे (५६) यांच्या कुटुंबावर बहिष्कार घालून त्यांना छळण्यात आले. किराणावर बंदी, सार्वजनिक सेवांवर प्रतिबंध घालण्यात आला. कुटुंबातील कोणालाच मजुरीने कामाला सांगणे बंद करण्यात आले. कुठल्याच कार्यक्रमात त्यांचा सहभाग घेतला गेला नाही. बहिष्कारचा कळस म्हणजे त्यांचा बदनामीकारक फलकही गावात लावण्यात आला.








