महापालिका निवडणूक प्रक्रियेत वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (पाडु) या यंत्रासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. मतमोजणी करताना तांत्रिक अडचण आल्यास अपवादात्मक परिस्थितीतच या यंत्राचा वापर केला जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या कंपनीद्वारे निर्मित ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्यास पाडु या यंत्राचा वापर करून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ‘पाडु’चा सरसकट वापर केला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्ट केले. ‘पाडु’विषयी राजकीय पक्षांनी आक्षेप घेऊन ऐन वेळी या अतिरिक्त यंत्रणेविषयी सांगण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, याविषयी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आधीच माहिती देण्यात आली होती, असे आयोगाचे म्हणणे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून, ती ‘एम३ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल युनिटला (सीयू) बॅलेट युनिट (बीयू) जोडूनच करावी, फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादा त्मकरीत्या ‘पाडु’चा वापर करावा, असे आयोगाचे आदेश आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी १४० ‘पाडु’ यंत्रांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. ‘पाडु’च्या वापराबाबत महापालिका प्रशासनाकडून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिके याआधी दाखविण्यात आली आहेत.





