पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वाराणसी येथे बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर केलेल्या कारवाईचा काँग्रेसने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई निषेधार्ह असून अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवड मंडळाची बैठक रविवारी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. पक्षाच्या या बैठकीत महापालिका निकालांवहरी चर्चा झाल्याचे समजते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मणिकर्णिका कारवाईवर टीका केली.
‘अहिल्यादेवींचा ३०० वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजप सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे मात्र अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप हे सरकार करत आहे’, अशी टीका सपकाळ यांनी केली. ‘हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा जनतेनेसमोर उघड झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही’, अशी टीका सपकाळ यांनी केली. भाजपच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी केली जाईल. ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे आघाडी करू परंतु राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणार नाही, असे सपकाळ यांनी यावेळी जाहीर केले.





