राज्यात युतीचे सरकार होते. नागपुरात पक्षवाढीसाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. अशात पश्चिम नागपुरात दबंग कार्यकर्ता म्हणून परिचित असलेले चिंतामण पहेलवान पक्षाच्या नजरेस पडले. १९९७पासून पहेलवान भाजपसाठी कसरत करू लागले. २००२च्या महापालिका निवडणुका घोषित झाल्या आणि पहेलवानचा वार्ड ‘महिला राखीव’ झाला आणि या निवडणुकीत त्यांच्या पत्नी माया लढल्या आणि विजयी झाल्या. तेव्हापासून त्या अपराजित राहिल्या. त्यांच्या स्वभावामुळे भाजपमधील सगळ्यांच्या ताई झाल्या. आज या ‘लाडक्या बहिणी’ला खासदारपदासाठी उमेदवारी मिळाली.
माया इवनाते यांच्यानिमित्ताने राज्यसभेवर उमेदवार पाठवताना भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबण्यात आले आहे. पक्षाच्यावतीने बुधवारी राज्यातील उमेदवारांच्या जाहीर करण्यात आलेल्या यादीत नागपूर महापालिकेच्या प्रभाग १२ब च्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी महापौर माया इवनाते यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इवनाते यांच्या निवडीने भाजपने अनुसूचित जमातींमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. इवनाते या आदिवासी समाजातून येत असून त्यांना पक्षाने २००७ ते २००९पर्यंत महापौरपदाची संधी दिली. त्या आदिवासी समाजातील पहिल्या महापौर ठरल्या होत्या.
पक्षाने आदिवासी व्यक्तीचा चेहरा उमेदवारीसाठी पुढे केल्याने अनुसूचित जमातींमध्ये पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर इवनाते बुधवारी नामांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्या. भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या असलेल्या इवनाते गेली अनेक दशके नागपूर तसेच राज्य पातळीवरील संघटनात्मक कामकाजात सक्रिय आहेत. इवनाते यांची राजकीय कारकिर्द २००२मध्ये सुरू झाली. त्या २००२मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १२मधून त्या सतत निवडून आल्या आहेत. सध्या त्यांची महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा समितीच्या सभापती म्हणून घोषित झाल्या असून या समितीची निवड ६ मार्च रोजी होणार आहे.
माया इवनाते यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य म्हणूनही काम केले आहे. भाजपमध्ये त्या राज्य उपाध्यक्ष पदावरही कार्यरत होत्या. विदर्भातील प्रमुख आदिवासी महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. १५१ सदस्यीय नागपूर महापालिका सभागृहात ७८ महिला नगरसेविका असून, त्यापैकी इवनाते यांनी खुल्या जागेवरून पुरुष उमेदवारांचा पराभव करीत विजय मिळवला. ही बाब त्यांच्या राजकीय ताकदीचे द्योतक मानली जात आहे. इवनाते यांची उमेदवारी ही भाजपची आदिवासी मतदारांमध्ये पकड मजबूत करण्यासोबतच विदर्भाचे संसदीय प्रतिनिधित्व बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची रणनीती मानली जात आहे.





