पक्षीजगताची मराठीतून ओळख

महाराष्ट्र टाइम्स

दिवाकर ठोंबरे यांचे 'खग' हे पुस्तक ७ मार्च रोजी मो. ह. विद्यालयात प्रकाशित होत आहे. या पुस्तकात १६० पक्ष्यांची सचित्र माहिती आहे. १०० पक्ष्यांसाठी क्यू आर कोड असून स्कॅन केल्यावर दृक-श्राव्य माहितीपट दिसतो. हे पुस्तक तरुणाईसाठी उपयुक्त ठरेल. पक्षीजगताची ओळख करून देणारे हे पुस्तक अभ्यासकांसाठी फिल्डगाइड म्हणूनही उपयोगी आहे.

पक्षीजगताची मराठीतून ओळख
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

घराच्या खिडकीतून इवले-इवले पक्षी पाच वाजता छान चिवचिवायला सुरुवात करतात. कधी निरखून पाहिले तर खिडकीतून त्यांचे दर्शनही होते. कधी सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडावे आणि सुंदर रंगाच्या पक्ष्याने दर्शन द्यावे आणि ती सकाळ अधिक प्रफुल्लित होऊन जावी, असेही काही वेळा घडते. हा पक्षी कधी कॅमेऱ्याच्या चौकटीत येता येता भुर्रकन उडून जातो आणि मग तो नेमका कोणता पक्षी होता, हा शोध अर्धवटच राहतो. या पक्षीजगताची ओळख करून देण्यासाठी पक्षी आणि फुलपाखरू अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांनी पुढाकार घेतला असून ‘खग’ हे त्यांचे पुस्तक येत्या शनिवारी ७ मार्च रोजी ठाणे येथील मो. ह. विद्यालयामध्ये प्रकाशित होत आहे.

मनकर्णिका पब्लिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाला ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’चे विशेष सहकार्य लाभले आहे.

पक्षी आणि माणूस यांच्यामध्ये नाते आहे. निसर्गचक्रातील या नात्याचा अभ्यास करताना अनेक मुद्दे समोर आले आणि त्यातून हे पुस्तक घडल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘इव्होक’ या सदरातील लेखक असलेले ठोंबरे सांगतात. या पुस्तकामध्ये १६० पक्ष्यांची सचित्र माहिती आहे. त्यातील १०० पक्ष्यांच्या माहितीसोबत क्यू आर कोड दिलेला असून या क्यू आर कोडवर स्कॅन केल्यावर दृक-श्राव्य माध्यमातून एक माहितीपटही समोर येतो. ‘खग’ या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना मराठीतून माहिती उपलब्ध करून दिली जात असून पक्षीचिकित्सा करणारे असे हे वेगळ्या वाटेवरचे मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक पॉकेट साइज आकारात उपलब्ध करण्यात आले आहे. तरुणाईची दृक-श्राव्य माध्यमाशी असलेली जवळीक लक्षात घेता दोन माध्यमांचे एकत्रिकरण या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अनेकदा मराठीतून सुलभ माहिती देणाऱ्या फिल्डगाइडची उणीव भासते. हे पुस्तक अभ्यासकांना फिल्डगाइड म्हणून उपयुक्त ठरू शकते. या माध्यमातून तपशील जमा करण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे. लोकांकडून तपशील जमा करण्यासाठी, निष्कर्षापर्यंत येण्यासाठीही या पुस्तकाची मदत होऊ शकते.

पुस्तक प्रकाशनासाठी प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, डॉ. उल्हास कोल्हटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुरंदरे हे पक्षी जगताची ओळखही करून देणार आहेत. कार्यक्रम सायं. ६.३० वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी निःशुल्क प्रवेश आहे.