दहा कोटींच्या खंडणीसाठी ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला थेट बिश्नोई गँगच्या नावाने धमकावण्यात आल्याच्या घटनेनंतर खंडणीखोरांनी पुन्हा डोके वर काढल्याने ठाणे जिल्ह्यातील व्यावसायिक चांगलेच हादरले आहेत. खंडणीखोरांची दहशत मोडीत निघणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत असताना ठाणे पोलिस आयुक्तालयात खंडणीच्या गुन्ह्यांचा आलेख मात्र वाढताना दिसत आहे. २०२४ मध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयात खंडणीचे एकूण ७५ गुन्हे नोंदवले गेले होते. त्यानंतर २०२५मध्ये या गुन्ह्यांत वाढ होऊन वर्षभरात ८५ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांत ठाणे आणि आसपासच्या शहरांतील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या देण्याच्या प्रकारावर काहीसा आळा बसला होता. मात्र, नुकतेच ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कोट्यवधी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी आल्याने पुन्हा धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत; मात्र खंडणीच्या वाढत्या प्रकारावर पूर्णपणे अंकुश बसलेला नसल्याचे चित्र आहे. ‘ प्रोटेक्शन मनी ’च्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याने ठाणे जिल्ह्यातील व्यावसायिक आणि उद्योजक त्रस्त झाले आहेत. मध्यंतरी खंडणीसाठी भिवंडीतील ई-कॉमर्स कंपनीच्या वितरण केंद्रात वाहतूक गाड्या अडवण्याचा प्रकार घडला होता. तसेच, माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकांना धमकावण्याचे प्रकारही समोर आले आहेत.
छोट्या-मोठ्या कामांतही खंडणीखोर पैसे उकळत असून, पैसे न दिल्यास थेट मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे व्यावसायिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. दोन वर्षांपूर्वी दहिसर मोरी परिसरात एक कोटी रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने एका व्यावसायिकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. मध्यंतरी एका प्रसिद्ध लेखकाला दहा लाख रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आली होती. एकूणच, खंडणीच्या गुन्ह्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
ठाणे पोलिस आयुक्तालयातील विविध ठाण्यांत २०२४मध्ये खंडणीचे एकूण ७५ गुन्हे नोंदवले गेले होते. त्यापैकी ९१ टक्के म्हणजे ६८ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. २०२५ मध्ये मात्र खंडणीच्या गुन्ह्यांत दहाने वाढ होऊन एकूण ८५ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी ८२ गुन्ह्यांची उकल झाली असून हे प्रमाण ९६ टक्के असल्याची माहिती आहे. तथापि, खंडणीसाठी धमक्या आल्यावर अनेक जण भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार करत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष गुन्ह्यांचा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, खंडणीखोरांच्या त्रासातून जिल्ह्यातील व्यावसायिकांची मुक्तता कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.





