शहरातील काही मेट्रो प्रकल्पांच्या पुलांमध्ये, खांबांमध्ये तसेच, गर्डर जोडण्याच्या ठिकाणी तडे गेले असल्याचे दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत असून कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. याची गंभीर दखल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए ) घेतली आहे. एमएमआरडीएच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे मेट्रो बांधकामाबाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
अलीकडील काळात सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झालेल्या काही चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांची यादीही एमएमआरडीएने तयार केली असून त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात येत आहे. चुकीच्या ‘व्हायरल मेसेज’वर त्याच वेळी सचित्र स्पष्टीकरण देण्यात येते. एमएमआरडीएच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे मेट्रो प्रकल्पांतील बांधकाम प्रक्रिया, पुलांची रचना, खांब, गर्डर जोडणी आणि सुरक्षेची मानके याबाबत सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. चुकीच्या माहितीला आळा घालणे आणि मेट्रो प्रकल्पांबाबत जनजागृती करणे हा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘सोशल मीडियावर पसरत असलेल्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीकडे नागरिकांनी सावधगिरीने पाहावे आणि अधिकृत माहितीच स्वीकारावी,’ असे आवाहन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
हे झाले ‘व्हायरल’
मेट्रो पुलांमध्ये मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचा दावा
खांबांच्या जोडणीत संरचनात्मक दोष असल्याचे व्हिडीओ
गर्डर बसवताना सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचे आरोप
काही बांधकामे ‘धोकादायक स्थिती’ दर्शवत असल्याचा छायाचित्रांद्वारे दावा.





