‘वी नीड यू’ सोसायटीचे सेवाव्रती पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र टाइम्स

'वी नीड यू' सोसायटीने यंदाचे पुरस्कार जाहीर केले आहेत. स्टॅलिन दयानंद यांना समाजव्रती, सुनीता भोसले यांना शिक्षणव्रती आणि बाळासाहेब आठरे यांना कार्यव्रती पुरस्कार मिळणार आहेत. हे पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शारदा साठे यांच्या हस्ते दिले जातील. रविंद्र धनक हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो.

‘वी नीड यू’ सोसायटीचे सेवाव्रती पुरस्कार जाहीर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘वी नीड यू’ सोसायटीतर्फे समाजात ‘व्रतस्थ वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवले जाते. यंदा स्टॅलिन दयानंद यांना समाजव्रती पुरस्कार, सुनीता भोसले यांना शिक्षणव्रती पुरस्कार तसेच बाळासाहेब आठरे यांना कार्यव्रती पुरस्कार देण्यात येणार आहेत. रविवार ८ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे ज्येष्ठ सामाजिक तसेच स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जीवन विकास मंदिर शाळेचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष रविंद्र धनक विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भांडुप परिसरातील 'वनशक्ती' या पर्यावरणवादी संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दयानंद स्टॅलिन यांना या वर्षीचा समाजव्रती पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भटक्या तसेच आदिवासी समाजात शिक्षणाचे मोल पोहोचवण्यासाठी काम करणाऱ्या आणि तब्बल १५० हून अधिक विद्यार्थी दत्तक घेतलेल्या सुनीता भोसले यांना शिक्षणव्रती पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच तालुका कृषी अधिकारी म्हणून करणाऱ्या बाळासाहेब आठरे यांनी शासकीय सेवेच्या मर्यादा ओलांडून केलेल्या लोकाभिमुख कामाचा गौरव त्यांना कार्यव्रती पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.