जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘भारत फायनान्स’ या खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या बँकेत ३१ लाख १२ हजार १६४ रुपयांचा अपहार झाल्याची घटना समोर आली आहे.
बँकेच्या ५ माजी वसुली अधिकाऱ्यांनी कर्जदार महिलांकडून हप्त्याची रक्कम वसूल करून ती बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. व्यवस्थापक मनीष देवचंद चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, हा सर्व गैरप्रकार ८ डिसेंबर २०२२ ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत झाला. लेखा परीक्षण अहवालामध्ये कर्जाची रक्कम कर्जदार महिलांकडून अधिकाऱ्यांनी वसूल केली. मात्र, ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
बँकेकडून कष्टकरी महिलांना कर्ज देण्यात आले होते. त्यापैकी ३३६ महिलांनी आपल्या भागातील बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांकडे नियमितपणे जमा केले. वसुली अधिकाऱ्यांनी ही रक्कम बँकेत जमाच केली नाही. महिलांनी पाठपुरावा केल्यानंतर बँकेकडून लेखापरीक्षण करण्यात आले, त्यात वसुली झाल्याचे स्पष्ट झाले, मात्र, ही रक्कम बँकेकडे प्राप्त झाली नसल्याने वसुली अधिकाऱ्यांचे बिंग फुटले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेने संबंधित वसुली अधिकाऱ्यांना वारंवार रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संशयितांनी थकीत रक्कम जमा केली नाही.






