मुंबई महापालिकेच्या १७पैकी ६ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत तीन प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले. अन्य तीन प्रभाग समित्यांमध्ये, शिवसेनेने एक, तर काँग्रेसने दोन समिती अध्यक्षपदे पटकावली. या सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.
चुरशीच्या ठरलेल्या एफ उत्तर व एफ दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना (उबाठा) पक्षास समिती अध्यक्षपद मिळण्याचा होरा असतानाच ऐनवेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे ‘उबाठा’च्या श्रद्धा जाधव यांचा शिवसेनेच्या उमेदवार मानसी सातमकर यांनी केवळ एका मताने पराभव केला. या निवडणुकीसाठी काँग्रेसने व्हिप जारी केला असतानाही काँग्रेसच्या नगरसेविका आयशा सूफियान वणू, सपच्या इरम सिद्दिकी गैरहजर राहिल्याने मानसी सातमकर यांना भाजपची पाच आणि शिवसेनेची तीन अशी आठ मते मिळाली. श्रद्धा जाधव यांना ‘उबाठा’ची सहा आणि मनसेचे एक अशी सात मते मिळाली. त्याचवेळी, अन्य पाच प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत, भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
आर मध् य आणि आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने एकही उमेदवार न दिल्याने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. ‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आकाश पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची व आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या लीना देहरकर यांची बिनविरोध निवड झाली. पी पूर्व आणि पी पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हैदरअली अस्लम शेख हे १० मते मिळवून निवडून आले. ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक ज्ञानराज निकम यांची निवड झाली.






