एप्रिल–मे ची उन्हाळी सुट्टी सुरू झाली की अनेक मुलांच्या हातात क्रीडा प्रशिक्षणाची संधी येते, पण महापालिका शाळांतील अनेक होतकरू विद्यार्थ्यांच्या वाट्याला मात्र ही संधी येत नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राजेंद्र कांबळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याची मागणी केली आहे.
उच्च व मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थी जलतरण, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, कराटे, तिरंदाजी, टेबल टेनिस आदी क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण घेत असताना, महापालिका शाळांतील अनेक विद्यार्थी या प्रवाहाबाहेर राहतात. योग्य सुविधा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्यास या विद्यार्थ्यांमधूनही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडू शकतात, असे त्यांनी नमूद केले आहे. वय वर्षे ८ ते १६ (इयत्ता तिसरी ते दहावी) हा क्रीडा कौशल्य विकासाचा महत्त्वाचा कालावधी असल्याने प्रारंभी या वयोगटासाठी विशेष शिबिरे राबवावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा संकुल, जलतरण तलाव व व्यायामशाळांमध्ये ही शिबिरे घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत किंवा नाममात्र शुल्कात प्रशिक्षण द्यावे, तसेच अनुभवी प्रशिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ही योजना राबविल्यास पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेला योग्य दिशा मिळून त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






