ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह चौघांची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. दिग्दर्शक अविनाश जाधव याने डोंबिवलीतील प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चांगल्या परताव्याचे आश्वासन दिले होते. ४७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जाधव याच्या विरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मृणालिनी जांभळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीनुसार एकाच क्षेत्रात असल्याने अविनाश जाधव यांच्याशी त्यांचा परिचय होता. २०१९मध्ये जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेत पनवेल येथील जमिनीचे प्लॉटिंग आणि उरण येथील इमारत बांधकाम प्रकल्पाला गती देण्यासाठी अर्थसहाय्य मागितले. या बदल्यात नफ्यात हिस्सेदारी आणि वर्षभरात मुद्दल परत देण्यात येईल, असे सांगण्यात आले. जांभळे यांनी या व्यवहाराबाबत भाऊ मंदार जांभळे, मैत्रीण वर्षा उसगावकर यांना सांगितले. वर्षा यांनी आपल्या एका मैत्रिणीस या गुंतवणुकीबाबत माहिती दिली.
अविनाश जाधव हा ओळखीचा असल्याने आणि गुंतवणुकीची चांगली योजना असल्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत चौघांनी मिळून ४७ लाख रुपये दिले. या व्यवहाराचा करार करण्यात आला आणि जाधव यांनी पोस्टडेटेड चेकही दिले. मात्र किरकोळ रक्कम परत केल्यानंतर त्यांनी उर्वरित पैसे देण्यासाठी टाळाटाळ करू लागले. याबाबत जांभळे यांनी तगादा लावला असता धमकावण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.






