दोन वर्षांनंतरही अंतिम निकालाची प्रतीक्षा

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल दोन वर्षांनंतरही लागलेला नाही. यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे. जाहिरात देऊनही परीक्षा प्रक्रिया लांबली आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होऊनही अंतिम यादी रखडली आहे. अनेक रिक्त पदे असतानाही भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होत नसल्याने विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत.

state service final results delay students concerns rise

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी जाहिरात देण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता असून, ते आपल्या नेमणुकीमध्ये आणखी काही अडथळे येणार नाहीत ना, या विवंचनेत आहेत.

लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी परीक्षा घेण्यात येतात. अलीकडील काही वर्षांमध्ये त्याचे वेळापत्रक अनियमित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल अस्वस्थता आहे. राज्यसेवा परीक्षा २०२४ची जाहिरात २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल एका वर्षाने पूर्व परीक्षा पार पडली. त्याचा निकाल मार्च २०२५मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुख्य परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होऊन मे २०२५अखेरीस मुख्य परीक्षा पार पडली. त्याचा निकाल सप्टेंबर २०२५मध्ये जाहीर करण्यात आला. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता लवकरच आपल्या नियुक्त्या जाहीर होऊन प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश मिळतील, अशी आशा वाटत होती. त्यानुसार ५ जानेवारीला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्याला आता दोन महिने उलटूनही अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, ऑप्टिंग आऊट व अपिलीय मेडिकल प्रक्रिया पूर्ण झालेली असली तरी अंतिम यादी अजून का प्रसिद्ध होत नाही, याबद्दल आता विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे आपल्या नियुक्त्या अडकल्या आहेत, याची चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झाली आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्याने या विद्यार्थ्यांचे पालकही आपल्या पाल्यांना नियुक्ती मिळणार की नाही, याबद्दल शंका व्यक्त करू लागले आहेत. शासनामध्ये अनेक रिक्त पदे असतानाही ही प्रक्रिया वेगाने पूर्ण का होत नसेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.