‘बाई तुझ्यापायी’ला परीक्षकांची पसंती

महाराष्ट्र टाइम्स

प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात 'मटा सन्मान' २०२६ पुरस्कार सोहळा पार पडला. 'बाई तुझ्यापायी' या वेब सीरिजने सर्वोत्कृष्ट वेबसीरिजसह दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सहायक अभिनेत्री हे सन्मान पटकावले. व्यावसायिक नाटक विभागात 'कुटुंब किर्रतन' सर्वोत्कृष्ट ठरले. 'देवमाणूस' ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरली. बालकलाकारांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांना गौरविण्यात आले.

‘बाई तुझ्यापायी’ला परीक्षकांची पसंती
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये गुरुवारी रंगलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत ‘मटा सन्मान’ २०२६’ पॉवर्ड बाय सारस्वत बँक पुरस्कार सोहळ्यात ‘ बाई तुझ्यापायी ’ या वेब सीरिजला गुरुवारी परीक्षकांची सर्वाधिक श्रेणींमध्ये पसंती लाभली.

वेब सीरिज विभागात ‘बाई तुझ्यापायी’ने सर्वोत्कृष्ट वेबसीरिजसोबतच दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सहायक अभिनेत्री हे सन्मानही मिळवले. निपुण धर्माधिकारी, सिद्धेश धुरी, क्षिती जोग आणि गौतम काची यांना हा सन्मान मिळाला. सर्वोत्कृष्ट लेखनासाठी नितीन पवार, नितीन वाडेवाले यांना ‘दहावी-अ’साठी पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तसेच अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला असून, यात क्षितिश दाते, कादंबरी माळी यांनाही गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून ओम पानस्कर यांना ‘दहावी-अ’ या वेबसीरिजमधील कामासाठी पुरस्कार मिळाला.

व्यावसायिक नाटक विभागात ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. ‘बोलविता धनी’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा सन्मान मिळाला. तर सर्वोत्कृष्ट लेखकासाठी क्षितिज पटवर्धन यांना ‘भूमिका’ नाटकासाठी गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीत सचिन खेडेकर, श्रेयस जोशी यांना; तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत मयुरी देशमुख, तन्वी मुंडले यांच्या अभिनयाला पसंती मिळाली. विनोदी अभिनयासाठी महेश मांजरेकर यांचा सन्मान करण्यात आला. चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. सविता दामोदर परांजपे, शंकर जयकिशन, मी व्हर्सेस मी, बेबल्याचो घो, का रुसली रखुमाई, बोरविता धनी या नाटकांनी यंदा ‘मटा सन्मान’वर आपले नाव कोरले.

टीव्ही मालिका विभागात ‘देवमाणूस’ सर्वोत्कृष्ट मालिका ठरली. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी भीमराव मुडे, पीयूष वेलंकीवार यांना गौरवण्यात आले. ‘देवमाणूस’ मालिकेला सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता या श्रेणीतही ‘मटा सन्मान’ प्राप्त झाला. स्वप्नील गांगुर्डे, किरण गायकवाड, मिलिंद शिंदे यांना या श्रेणीत गौरव करण्यात आला. अभिनेत्री विजया बाबर यांना ‘कमळी’ मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. वचन दिले तू मला, तारिणी, सखा माझा पांडुरंग या मालिकांनीही यावेळी ‘मटा सन्मान’ची कौतुकाची पावती मिळवली. या पुरस्कारांसोबतच लक्षवेधी अभिनयासाठी त्रिशा ठोसर, मायरा वाळकुळ, स्वराली खोमणे, प्रिन्स सलवदे या बालकलाकारांना गौरवण्यात आले. लक्षवेधी अभिनेयसाठी दिलीप प्रभावळकर, पर्ण पेठे, कपिल रेडकर यांनाही सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटकासाठी सविता दामोदर परांजपे, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमासाठी दशावतार, पीएनजी थिंक प्युअर सिनेमा श्रेणीत उत्तर तर तन्वी हर्बल्स फ्रेश फेस म्हणून साजिरी जोशी यांना सन्मान करण्यात आला. या गौरवामुळे बालकलाकारांपासून मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांपर्यंत आनंदाचे वातावरण होते.