Strict Warning From Government To Control Black Marketing
‘काळाबाजार केल्यास याद राखा’
महाराष्ट्र टाइम्स•
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला आहे. पश्चिम आशियातील संकटाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. स्वयंपाकाच्या गॅसवरून अफवा पसरवणाऱ्यांवरही टीका केली. भारत जगासाठी गुरुत्वाकर्षणाचे केंद्र बनत आहे. विकसित भारताच्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत आहे.
पश्चिम आशियातील सध्याच्या गंभीर परिस्थितीमुळे कोणताही देश अलिप्त राहू शकत नाही. भारताची ऊर्जा सुरक्षा जपण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संकटाचा फायदा घेऊन काही लोक विशिष्ट वस्तूंचा काळाबाजार करत आहेत, अशांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिला. स्वयंपाकाच्या गॅसवरून काही लोक उगाच भीती पसरवत आहेत. हे लोक स्वतःलाच उघडं पाडत आहेत आणि देशाचंही नुकसान करत आहेत, असं ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना ही भूमिका मांडली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी राजकीय पक्ष, माध्यमे, तरुण, शहरे आणि गावे या सर्वांची महत्त्वाची भूमिका आहे. अनेक जागतिक संकटे असतानाही जगातील नेते आणि तज्ज्ञ भारताकडे मोठ्या आशेने पाहतात. त्यामुळे भारताच्या जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. आज जगाला हे माहीत आहे की, जर तुम्हाला भविष्याचा भाग व्हायचं असेल, तर भारताशी जोडले गेले पाहिजे आणि भारतात असले पाहिजे.'एकच ध्येय आहे, एकच स्थान आहे, ते म्हणजे विकसित भारत. भारत केवळ प्रगती करीत नाही, तर तो पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे,' असंही पंतप्रधान म्हणाले. जग एका कठीण टप्प्यातून जात आहे, पण भारत वेगाने आणि स्थिर गतीने पुढे जात आहे. 'अनेक जागतिक नेते सांगत आहेत की, भारत संपूर्ण जगासाठी गुरुत्वाकर्षणाचे केंद्र बनत आहे,' असं मोदी यांनी नमूद केलं.
या संकटाच्या काळात, देशातील नागरिकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी सरकार विविध देशांशी चर्चा करत आहे आणि पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, जेणेकरून नागरिकांना वस्तू योग्य दरात मिळतील. देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे.