नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदवता याव्यात, यासाठी महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र’ हे मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. मात्र, हे ॲप सध्या बंद पडले असून, महापालिका प्रशासनच याबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते १२ ऑगस्ट २०२५ रोजी या अ ॅपचे अनावरण करण्यात आले होते. रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढून अ ॅपवर अपलोड केल्यास ते थेट पथ विभागाकडे पोहोचून ७२ तासांत खड्डे बुजवले जातील, असा दावा करण्यात आला होता. खड्डा बुजवण्याची जबाबदारी संबंधित उपअभियंत्यावर निश्चित केली जाईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वी व नंतरचे फोटो अपलोड करून तक्रार बंद होईल, अशी या ॲपची कार्यप्रणाली होती.
या अ ॅपद्वारे नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निरीक्षण करण्यासाठी विशेष डॅशबोर्डही तयार केला होता. कोणत्या क्षेत्रातून किती तक्रारी आल्या, त्या किती कालावधीत निकाली काढल्या, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार होती. त्यामुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होईल आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात हे अ ॅप काही काळानंतरच बंद पडले आहे. हे ॲप सुरू आहे की बंद, याची माहिती पथ विभागाकडेही नाही.








