तीन वर्षांत धावेल१५० किलोमीटर मेट्रो

महाराष्ट्र टाइम्स

पुण्यात पुढील दोन ते तीन वर्षांत १५० किलोमीटर मेट्रो धावणार आहे. लोहगाव विमानतळाचा विकास आणि 'मिसिंग लिंक'सारखे प्रकल्प शहराची कनेक्टिव्हिटी वाढवतील. पुणे जागतिक दर्जाचे केंद्र बनणार आहे. स्थावर संपदा क्षेत्राच्या मदतीने शहराचा विकास साधला जाईल. वाहतूक व्यवस्थापनासाठी स्मार्ट प्रणालीवर काम सुरू आहे.

तीन वर्षांत धावेल१५० किलोमीटर मेट्रो
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘सुरुवातीच्या ३२ किलोमीटर अंतरावर पुणे मेट्रो आधीच सुरू झाली आहे. नव्या मार्गिकांनाही मंजुरीही मिळत आहे. पुढील दोन-तीन वर्षांत पुण्यात १५० किलोमीटर मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होऊ शकेल,’ असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

‘क्रेडाई पुणे’च्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ बोलत होते. या सभेत शहराच्या शहरी विकास आणि स्थावर संपदा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आघाडीचे विकासक, उद्योगतज्ज्ञ आणि धोरणनिर्माते सहभागी झाले होते. या सभेला २००हून अधिक ‘क्रेडाई, पुणे’ सदस्य विकासक उपस्थित होते.

‘क्रेडाई पुणे’चे अध्यक्ष मनीष जैन आणि उपाध्यक्ष यांनी गेल्या वर्षभरात संस्थेने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

मोहोळ म्हणाले, ‘लोहगाव विमानतळाच्या विकासामुळे मोठ्या विमानांना उतरण्याची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. ‘मिसिंग लिंक’सारखे प्रकल्प प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करीत आहेत. पुण्याला जागतिक क्षमता केंद्रांची (जीसीसी) राजधानी आणि नवोपक्रमांचे केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट आहे. विमानतळाजवळ ‘भारत मंडपम इनोव्हेशन सेंटर’सारखे प्रकल्प नियोजित आहेत. या विकासामुळे नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा , सुलभ कनेक्टिव्हिटी आणि उच्च दर्जाचे जीवनमान मिळेल.’

‘पुण्याच्या भविष्यातील शहरी विकास घडवण्यात स्थावर संपदा क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. नवोपक्रम, पारदर्शकता आणि सरकार; तसेच नागरी संस्थांशी सहकार्य हे शाश्वत आणि नियोजनबद्ध शहर घडविण्यासाठी आवश्यक आहे. पोलिस विभागासोबत ‘ट्रफिक्युअर’ या स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन प्रणालीवर प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक सनियंत्रण आणि व्यवस्थापन सुधारण्यात पोलिसांना मदत होत आहे,’ असे ‘क्रेडाई पुणे’चे अध्यक्ष मनीष जैन यांनी सांगितले. सीए सार्थक आहुजा यांनी ‘पर्सनल ब्रँडिंग फॉर सीईओज अँड बिझनेसेस’ या विषयावर विशेष सत्र घेतले.