ट्रकच्या धडकेत ऑटोचालक ठार

महाराष्ट्र टाइम्स

सावनेर जवळ माळेगाव येथे भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. या अपघातात ऑटोचालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सावनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी नागरिकांना शांत केले आणि वाहतूक पूर्ववत झाली. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

auto driver killed in truck accident citizens stage roadblock

सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव येथे भरधाव ट्रकच्या धडकेत ऑटोचालक ठार झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सावनेर मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. रास्तारोकोमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

पोलिसांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर तणाव निवळला आणि सावनेर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. इंद्रजित नत्थुजी निकोसे (वय ५१, रा. माळेगाव, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. शनिवारी दुपारी इंद्रजित हे एमएच-३१-सीव्ही-५९०४ या क्रमांकाच्या ऑटोने जात होते. माळेगाव परिसरात समोरून येणाऱ्या एमएच-०९-जीडी-३३९७ या क्रमांकाच्या ट्रकने ऑटोला धडक दिली. ऑटो चक्काचूर होऊन इंद्रजित यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिक रस्त्यावर जमले. या परिसरात नेहमीच अपघात घडतात. प्रशासनाकडून अपघात रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी रास्तारोको केला. त्यामुळे तणाव निर्माण होऊन वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर तणाव निवळला आणि वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.