आज, रविवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध सतारवादक पं. पार्थ बोस यांचे सतारवादन तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय आणि सुगम संगीतातील लोकप्रिय गायिका देवकी पंडित यांचे शास्त्रीय गायन रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
बासरीच्या मधुर स्वरांची जादू ओसरत नाही तोच गायनातून उमटलेल्या स्वरांनी रसिकांच्या मनाचा ताबा घेतला. एकीकडे बासरी तर दुसरीकडे गायन असा सुरांचा अनुपम सोहळा नागपूरकर संगीतप्रेमींनी शनिवारी संध्याकाळी अनुभवला.
‘सप्तक’ संस्थेच्यावतीने प्रसिद्ध संगीतकार अन्नपूर्णा देवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच मोरेश्वर माधव देशपांडे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित द्विदिवसीय संगीत महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. गायत्रीनगर येथील पर्सिस्टंट सिस्टीमसच्या कविकुलगुरू कालिदास सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध बासरीवादक पंडित नित्यानंद हल्दीपूर यांनी आपल्या बासरीवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी राग मारवाच्या वादनाने केली. ‘मोहे पनघट पे’ हा दादरा सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. त्यांच्या सादरीकरणाला तानपुऱ्यावर ऊर्जा बहादुरे, तबल्यावर स्वप्नील भिसे आणि बासरीवर आंद्रे ड्रेगॉय यांनी उत्तम साथ दिली. कलाकारांचे स्वागत विवेक देशपांडे यांनी केले.
यानंतर, किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाचा आनंद रसिकांनी घेतला. राग शुद्ध कल्याणमधील ‘तुम बिन कौन खबरिया ले’ हे पद त्यांनी सादर केले. त्यांच्या गायनाला तानपुऱ्यावर ऊर्जा बहादुरे, तबल्यावर स्वप्नील भिसे आणि संवादिनीवर अभिनय रवंधे यांनी सुरेल साथ दिली. कलाकारांचे स्वागत सप्तकचे डॉ. श्रीराम काणे यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. विवेक अलोणी व गौरी मोडक यांनी केले. याप्रसंगी, अनेक नागपूरकर संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रदीप मुंशी, नितीन सहस्रबुद्धे, निनाद मानेकर, उदय पाटणकर व विकास लिमये प्रयत्नरत आहेत. या कार्यक्रमासाठी स्पेसवूड, बैद्यनाथ आणि पर्सिस्टंट सिस्टीम्स यांचे सहकार्य लाभले आहे.








