अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद पुन्हा उफाळून आला. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना स्थगिती देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे त्या कामांना मंजुरी मिळाली नाही.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद अद्यापही सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीलाच आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
शिवसेनेचे नगरसेवक कुणाल भोईर यांनी नगराध्यक्ष मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप केला. त्यावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. दरम्यान, कोहोजगाव येथील खदानीतील गाळ आणि माती काढण्याच्या सुमारे ६० लाख रुपयांच्या कामाबाबत शिवसेनेचे नगरसेवक अब्दुल शेख यांनी प्रश्न उपस्थित केला. गाळ काढण्यासाठी इतका खर्च का होत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर भाजपचे प्रदीप पाटील यांनी प्रत्युत्तर दिल्याने सभागृहात काही काळ वाद झाला.
तसेच पूर्व भागातील बाबासाहेब पुरंदरे उद्यानाच्या वापराबाबतही चर्चा झाली. उद्यानाचा वापर करण्यासाठी महापालिकेऐवजी स्वीकृत नगरसेवक सुभाष साळुंखे यांची परवानगी घ्यावी, असा सल्ला काही अधिकाऱ्यांकडून दिला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर शिवसेनेच्या नगरसेविका अमृता मोहरीकर आणि स्वप्निल बागुल यांनी आक्षेप घेत पालिकेच्या मालमत्तांवर नगरपालिकेचाच ताबा असावा, अशी मागणी केली.
दरम्यान, दिवसभराच्या गोंधळानंतर रात्री उशिरा सभेतील कामकाज सुरू झाले. त्यावेळी शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विषय रद्द करण्याचा प्रस्ताव अब्दुल शेख यांनी मांडला. शिवसेना नगरसेवकांच्या बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवेळी शिवसेनेच्या संख्याबळाचा विचार न करता भाजपने निर्णय घेतल्याचा आरोप करत, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुळे आणि अब्दुल शेख यांनी सांगितले. तर शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण केला जात असल्याचे मत नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे-पाटील यांनी व्यक्त केले.








