केवळ विदर्भच नव्हे तर विदर्भाबाहेरील साहित्यवर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचा निकाल आज, रविवारी जाहीर होणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. अध्यक्ष आणि २२ जणांची कार्यकारिणी निवडण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.
१ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यासाठी ही निवडणूक होते आहे. या निवडणूक प्रक्रियेला ७ जानेवारीपासून प्रारंभ झाला. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते यांच्यासह गिरीश गांधी , श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. रवींद्र शोभणे आणि डॉ. रंजन दारव्हेकर रिंगणात आहेत. चार पॅनेल्स आणि स्वतंत्र उमेदवार मिळून एकूण ८३ उमेदवारांमधून कार्यकारिणीतील २२ सभासद निवडले जातील.
वि. सा. संघाच्या प्रक्रियेप्रमाणे विदर्भात विविध ठिकाणी असलेल्या मतदारांकडून मतपत्रिका भरून त्या पोस्टाने मागविण्यात आल्या. शनिवार, १४ मार्चला सायंकाळी ६ वाजेपर्यंत या मतपत्रिका पाठविण्याची मुदत देण्यात आली होती. दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या काळात अत्यंत मर्यादित वर्तुळात होणाऱ्या या निवडणुकीत यंदा अनेक जण शड्डू ठोकून उभे आहेत. उमेदवारांच्या वाढलेल्या संख्येमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप थेटपणे या निवडणुकीत काम करीत असल्याचे आक्षेप उमेदवारांकडून घेण्यात आले होते. त्यावर गडकरी यांनी आपला या निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचेही जाहीर केले होते. मात्र, राजकीय हस्तक्षेपाचे आरोप अखेरपर्यंत होत राहिले.
मतपत्रिका पळविण्याच्या आणि परस्पर मतदान करण्याच्या प्रकारावरूनही निवडणुकीदरम्यान गदारोळ उडाला. यासंदर्भात, लवादाकडेही धाव घेण्यात आली होती. विदर्भ साहित्य संघाच्या या निवडणुकीने साहित्य वर्तुळात मोठा धुरळा उडाला. निवडणुकीचा हा गदारोळ शनिवारी संध्याकाळीसहा वाजता संपुष्टात आला. आज, रविवारी होणाऱ्या मतमोजणीत विदर्भातील साहित्यप्रेमी मतदारांनी नेमक्या कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकले, हे स्पष्ट होईल.
सात टेबल तयार...
वि. सा. संघाच्या अमेय दालनात ही मतमोजणी होईल. या दालनात सीसीटीव्हींची सोय आहे. निवडणूक अधिकारी मोहन पारखी यांच्या नेतृत्वात अतिशय पारदर्शी व्यवस्था करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची मतमोजणी एकाच टेबलवर होईल तर कार्यकारिणीसाठीच्या ८३ उमेदवारांची मते मोजण्यासाठी सहा टेबल्सची व्यवस्था राहणार आहे. प्रत्येक टेबलवर ५० ते १०० मतपत्रिका देऊन मोजणी केली जाईल. अध्यक्षपदाचा निवडणुकीचा निकाल दुपारनंतर आला तरी कार्यकारिणीतील विजयी सदस्यांची अंतिम २२ नावे येण्यासाठी रात्री उशीर होऊ शकतो, असे कळते.
वि. सा. संघाने ७ हजार ४९३ मतदारांना पोस्टाने मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी २,००७ मतपत्रिका या चुकीच्या पत्त्यामुळे परत आल्या. यातील ५०६ मतदारांनी आपली ओळख पटवून मतदान केले. अखेरपर्यंत ४ हजार ९३५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी टपालाने १ हजार ५२९, मतदारांकडून ५७५ तर प्रतिनिधींद्वारे २ हजार ८३१ मतपत्रिकांचे मतदान झाले. १,५०१ मतदारांचे मतदान विविध कारणांमुळे झालेले नाही.








