पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा श्रीराम जन्मोत्सव आणि शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांची सुरुवात गुरुवार, १९ मार्च गुढीपाडव्यापासून होणार आहे.
रामनगर येथील श्रीराम मंदिरात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्याचे यंदाचे ५२वे वर्ष असून गीतरामायण, सचित्र रामकथा सादरीकरण तसेच महिलांकडून काढण्यात येणारी बुलेट रॅली मुख्य आकर्षणाचे केंद्र राहील, अशी माहिती पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवि वाघमारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
बुधवार, १८ मार्च रोजी रमेश शिलेदार यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिन’ या विषयावर व्याख्यान राहणार आहे. १९ मार्च ते तीन एप्रिलपर्यंत आयोजित या सोहळ्यातील सर्वच कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता राहतील. पहिल्या दिवशी गुरुवारी विशाखा मंगदे आणि चमूतर्फे ‘रामगुणगान’ या बंदिशीवर आधारित कार्यक्रम होईल. २० ते २३ मार्चपर्यंत स्वाती भालेराव आणि शिष्यांचे ग. दि. माडगूळकर रचित ‘संपूर्ण गीत रामायण’चे सादरीकरण होईल. २४ मार्च रोजी प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या श्रीरामांच्या चित्रांवर आधारित ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम’ हा सचित्र रामकथेचा कार्यक्रम राहील. त्यापुढील दिवशी संस्कार भारतीतर्फे ‘अर्थ श्रीराम चरित्र’ संकल्पनेंतर्गत नृत्याचा कार्यक्रम राहील. गुरुवार, २६ मार्च रामनवमीला मुख्य शोभायात्रा निघेल. श्रीरामांच्या पालखी व राम रथाचे पूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या राम जन्मोत्सव शोभायात्रेत ‘संविधान मे क्रिष्ण’ ही नवीन प्रतिकृती राहील. गुरुवार, २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता रामनगर येथील राम मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर बाजीप्रभू चौक, लक्ष्मीभुवन चौक, कॉफी हाउसमार्गे धरमपेठ झेंडा चौक, पुन्हा लक्ष्मीभुवन चौक, शंकरनगर येथील वीर सावरकर चौक, बजाजनगर, लक्ष्मीनगर चौक, श्रद्धानंदपेठ चौक, व्हीएनआयटी चौक, एलएडी कॉलेज, गांधीनगर चौक आणि शेवटी रामनगर येथील राम मंदिरात शोभायात्रेचा समारोप होईल, असे पश्चिम नागपूर नागरिक संघाचे कार्याध्यक्ष योगेश पाचपोर यांनी सांगितले.








