आंतरिक ऊर्मीतून साकारला कृष्ण

महाराष्ट्र टाइम्स

नागपूर येथे आयोजित कला महोत्सवात कबीर गायन आणि 'चक्रव्यूह' नाटकाचा प्रयोग सादर झाला. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी कृष्णाची भूमिका साकारली. त्यांनी सांगितले की, आयुष्यातील अडचणींवर कृष्णाचे उत्तर समर्पक असते. 'चक्रव्यूह' नाटकाचा उद्देश हा वारसा नव्या पिढीला देणे आहे. या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आंतरिक ऊर्मीतून साकारला कृष्ण
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

या कला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी, १३ मार्च रोजी पद्मश्री डॉ. भारती बंधू यांच्या कबीर गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘राम बिना कछु नाही’, ‘जरा धीरे धीरे गाड़ी हांको मोरे राम गाडीवाले’ अशी भजने त्यांनी सादर केली. तत्पूर्वी, केंद्राने खजुराहो येथे आयोजित केलेल्या नाट्य कार्यशाळेतील कलावंतांनी ‘भरत मिलाप’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. बुंदेली भाषेतील या नाटकात बुंदेलखंडमधील पारंपरिक लोकनृत्य आणि लोकगायनही सादर करण्यात आले.

आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीवर समर्पक उत्तर देण्याचे सामर्थ्य कृष्ण ात आहे. मी मानसिक स्तरावर कृष्ण पाहिला आणि अनुभवला. एका आंतरिक ऊर्मीतून मी कृष्णाचे रूप साकारण्याचा प्रयत्न केला, असे मत प्रख्यात अभिनेते नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केले.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर तसेच संस्कृती मंत्रालय, भारत सरकारद्वारा दमक्षे सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदी महानाट्य ‘चक्रव्यूह’चा प्रयोग शनिवारी सादर करण्यात आला. त्यामध्ये भारद्वाज यांनी कृष्णाची भूमिका साकारली. या नाटकानिमित्त झालेल्या पत्रपरिषदेत त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. ‘कृष्ण म्हणजे सच्चिदानंदाचा उत्सव आहे. आपल्या प्रत्येक महाकाव्यातून वर्तमान परिस्थितील कठीण समस्या सोडविण्यासाठी अचूक बोध मिळतो. हाच आपला संपन्न वारसा नव्या पिढीसमोर मांडणे हा ‘चक्रव्यूह’चा हेतू आहे. देशात आणि परदेशात या नाटकाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. कृष्णासारख्या व्यक्तिरेखा साकारताना संपूर्णत समर्पित भाव आवश्यक आहे. महाभारत, विष्णूपुराण आणि चक्रव्यूहमधील भूमिकांनी मला अत्यंत आनंद दिला’, असेही भारद्वाज म्हणाले. यावेळी दमक्षे सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर आणि सहसंचालक मिथिला तळवणेकर उपस्थित होत्या. ‘माझ्या जडणघडणीत व्यासंगी आईवडील तसेच बाळशास्त्री हरदास यांचे लेखन, दुर्गा भागवत यांचे ‘व्यासपर्व’, इरावती कर्वे यांचे साहित्य, गीता, ज्ञानेश्वरी या पुस्तकांचा मोलाचा वाटा आहे’, असेही भारद्वाज म्हणाले.