‘बायपास १ जूनपर्यंत खुला’

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी बायपासचे काम सुरू आहे. खासदार सुनील तटकरे यांनी १ जूनपर्यंत बायपास खुला करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पुलांचे काम अपूर्ण असल्याने आणि पावसाळ्यामुळे कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘बायपास १ जूनपर्यंत खुला’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबई-गोवा महामार्गवरील माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येत असलेला बायपास १ जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे. मात्र, या रस्त्यांच्या कामाचा वेग आणि उर्वरित काम पाहता हा दावा अवास्तव असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बायपास मार्गातील काळ नदीवरील पूल, रेल्वेवरील उड्डाणपूल तसेच गोद नदीवरील पूल या महत्त्वाच्या संरचनांचे काम अद्याप अपूर्ण आहे. या पुलांचे बांधकाम पूर्ण करून त्यासोबतचे सर्व्हिस रोड, भरणकाम आणि अंतिम डांबरीकरण करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच, पुलांच्या दोन्ही बाजूंना भराव करून रस्ता स्थिर होण्यासाठीही काही महिने लागतात. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत बायपास पूर्ण होणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पावसाळ्यात काम मंदावते तर काही ठिकाणी ते पूर्णपणे थांबते. बायपाससाठीचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काम वेगाने सुरू ठेवले आणि कोणत्याही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आल्या नाहीत तरही बायपासची एक बाजू ३१ मेपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात येते.

दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांनी माणगाव येथील आनंद भवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी माणगाव बायपास पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सांगितले होते. यामुळे एकीकडे जूनपर्यंत बायपास सुरू करण्याचे राजकीय आश्वासन, तर दुसरीकडे प्रत्यक्ष कामातील अडथळे, कामाची गती आणि तांत्रिक वास्तव यांमध्ये मोठा विरोधाभास दिसून येत आहे. त्यामुळे बायपास नेमका कधी पूर्ण होणार, असा प्रश्न वाहतूककोंडीने त्रस्त असलेले गोवा मार्गावरील प्रवासी आणि माणगाव व इंदापूर परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.