मुलीच्या लग्नपत्रिका वाटताना वडिलांचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स

मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या वडिलांचा आणि त्यांच्या मित्राचा ट्रक उलटून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अर्जुनी-वडसा मार्गावर घडली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. या घटनेमुळे इंदोरा गावात शोककळा पसरली आहे. दोन्ही मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

tragic accident while distributing wedding invitations two die on the scene

मुलीच्या लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी गेलेल्या वडिलांचा आणि त्यांच्या मित्राचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास अर्जुनी-वडसा मार्गावरील आसोली ते गौरनगर दरम्यान घडली. रमेश बिसन साऊस्कार (४९) व अशोक मोरेश्वर काळबांधे (५२) रा. इंदोरा ता. लाखांदूर अशी मृतकांची नावे आहे.

इंदोरा येथील रमेश साऊस्कार यांच्या मुलीचे लग्न २ एप्रिल रोजी नियोजित आहे. घरामध्ये लग्नाची लगबग सुरू असताना, लेकीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ते त्यांचे मित्र अशोक काळबांधे यांच्यासह मोटारसायकलने खामखुरा येथे गेले होते. दिवसभर नातेवाइकांना पत्रिका देऊन सायंकाळी गावी परतत असताना, आसोली ते गौरनगर दरम्यान एका वळणावर गिट्टीने भरलेला ट्रक त्यांच्या अंगावर उलटला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकमधील गिट्टीखाली दबल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. रमेश साऊस्कार हे कृषी केंद्राचे संचालक होते. तर अशोक काळबांधे हे छायाचित्रकार होते. या घटनेने इंदोरा गावात शोककळा पसरली. शनिवारी दुपारी शोकाकूल वातावरणात दोन्ही मित्रांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.