‘भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती’

महाराष्ट्र टाइम्स

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी इराण आणि इस्त्राइल-अमेरिका यांच्यातील युद्धावर भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले की, भारताने शांततेचा संदेश देऊन विश्वगुरू होण्याची संधी गमावली. या युद्धाचा परिणाम एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यात झाला आहे. भाजपवर त्यांनी लोकांमध्ये फूट पाडण्याचा आरोप केला.

‘भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘इराण आणि इस्त्राइल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती. हे युद्ध थांबविण्याचा प्रयत्न करून शांततेचा संदेश जागतिक व्यासपीठावर देऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरीच विश्वगुरू झाले असते’, असा टोला समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार कार्यक्रमात ते बोलत होते.

‘गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात अनेक महिला आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या युद्धाचा परिणाम होत आहे. पंतप्रधान आणि भाजपसाठी विश्वगुरू होण्याची ही संधी आहे. आपण युद्धाच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी होती. या युद्धात भूमिका न घेतल्याचा जोरदार फटका भारताला बसत असून त्याची परिणती एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यात झाली आहे. एलपीजी आता ‘लापता गॅस’ झाली आहे’, अशी टिप्पणी त्यांनी केली. ‘भाजप हा लोकांमध्ये फूट पाडणारा व अफवाजीवी पक्ष असून तो खोटे पसरवतो, लोकांना दिशाभूल करतो आणि कटकारस्थान आखतो’, असा आरोपही त्यांनी केला.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर संघर्ष उद्भवला आहे. आखाती देशांतील युद्धाचा परिणाम इंधनाच्या पुरवठ्यावर झाला आहे.