‘सप्तशृंगीदेवी ट्रस्ट’ची निवड स्थगित

महाराष्ट्र टाइम्स

सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निवड प्रक्रियेतील त्रुटींवर आक्षेप घेत काही जणांनी न्यायालयात तक्रार केली होती. यामुळे नवीन विश्वस्त मंडळाच्या निवडीला तात्पुरता ब्रेक लागला आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आणि संबंधित घटकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘सप्तशृंगीदेवी ट्रस्ट’ची निवड स्थगित
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

अर्धशक्तिपीठ व उत्तर महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने शनिवारी (दि. १४) ई-मेलद्वारे नाशिक न्यायालयाला कळवले आहे. विश्वस्त मंडळाच्या मुलाखतीस पात्र व अपात्र ठरलेल्यांपैकी काहींनी निवडप्रक्रियेबाबत आक्षेप घेत उच्च न्यायालयात तक्रारी केल्याने ही स्थगिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी १२ मार्च रोजी विश्वस्त मंडळाच्या नवनियुक्तीसंदर्भात अधिकृत आदेश जारी केले होते. या नवीन समितीमध्ये पाच सदस्यांची नियुक्ती झाली होती. तेरा मार्च २०२६ ते १२ मार्च २०३१ असा पाच वर्षांचा त्यांचा कार्यकाळ राहणार होता. या नवनियुक्त सदस्यांमध्ये अॅड. राहुल खुटाडे (रा. गंगापूर रोड, नाशिक), विष्णू वारुंगसे (रा. गोविंदनगर, नाशिक), डॉ. राजेंद्र वराडे (रा. नाशिकरोड), माजी न्यायाधीश दिलीपकुमार देशमुख (रा. कळवण) आणि डॉ. कांचन देसले (रा. गंगापूर नाका, नाशिक) यांचा समावेश होता. यापैकी एका विश्वस्ताचे दोन सख्खे भाऊ यापूर्वी विश्वस्त मंडळात होते. या विश्वस्तांचा एक नातलग नवीन मंडळात नियुक्त झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये या निवडप्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ऑक्टोबरमध्ये मुदत संपल्यानंतरही मुलाखती व पुढील प्रक्रिया राबविण्यात आलेली नव्हती. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त अर्जांपैकी ३०९ अर्ज पात्र व ३१६ अपात्र ठरविण्यात आले. पात्र सदस्यांमध्ये मावळत्या विश्वस्त मंडळातील सदस्यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता, तर अपात्र सदस्यांमध्येही विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वकील क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचाही समावेश होता.