चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने जयताळ्यातील विद्यासाधना कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेजमधून पहिल्यांदा बारावीचा पेपर फोडल्याची नवी माहिती सदर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. अविनाश आडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चरणदास प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक संदीप बाबुराव सरटकर (वय ४६, रा. जयताळा हनुमान मंदिराजवळ), दिनेश कोटांगळे (वय ३६, रा. कबीरनगर), विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप भय्यालाल जांगडे (वय ४०, रा. वैशालीनगर), एज्युकेशन ॲकेडमीचे संचालक मनीष शंभरकर (वय ४६, रा. गोदाम लेआउट, त्रिमूर्तीनगर), एक्सलेंट अकादमी या शिकवणी वर्गाचे संचालक मुस्तफा खान मुनीर खान (वय ४२, रा. भानखेडा, तहसील), जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद (वय २०, रा. हसनबाग, नंदनवन), निशिकांत सुखदेव मूल (वय ४०, रा. मानकापूर) आणि बारावीचा विद्यार्थी फरहान अख्तर फहीम अख्तर (वय १८, रा. ऑटोमोटिव्ह चौक, कपिलनगर) या आठ जणांना अटक केली.
संदीप, दिनेश, प्रदीप व मनीष यांची पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीअंतर्गत चौघांची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणात फरहान याला जामीन मिळाला आहे.









