सुसंवाद

Contributed byप्रा. मनीषा रत्नाकर रावराणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद हा केवळ उपदेश नाही, तर तो भावपूर्ण आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला 'परमपदा'चे ज्ञान देतात. हे ज्ञान ईश्वराशी एकरूप होण्याची अवस्था आहे. ज्ञानदेव श्रीकृष्णांना एक आदर्श गुरू म्हणून रेखाटतात, जे महत्त्वाचे ज्ञान पुन्हा पुन्हा देतात. या संवादातून अर्जुनाची ज्ञानाची आस आणि दोघांमधील मोकळेपणा दिसून येतो.

सुसंवाद

रूने बोलावे, शिष्याने ऐकावे हे घडताना आपण नेहमी पाहतो. पण ‘ ज्ञानेश्वरी ’त ज्ञानदेव, श्रीकृष्ण-अर्जुन नाते चितारतात ते या पलीकडचे, अत्यंत हृद्य, भावपूर्ण आहे! त्यांच्याच शब्दांत ‘शब्देविण संवादु दुजेंविण अनुवादु’. याचा सुंदर अनुभव ज्ञानेश्वरी देते. आठव्या अध्यायातील अशाच एका भावस्पर्शी प्रसंगाचं वर्णन आज पाहू या. ज्ञानियांच्या प्रतिभेने ते कसे हृदयंगम होते! गीतेतील या भागात श्रीकृष्ण अर्जुनाला ‘परमपदा’चे ज्ञान देत आहेत. ‘परमपद’ म्हणजे ईश्वराशी एक होण्याची अवस्था. ज्ञानी भक्त असा एकरूप झालेला असतो, म्हणून मृत्यूसमयीदेखील मनाने तो स्थिर असतो. मृत्यूसमीप त्याचे वर्तन कसे असते याचे संपूर्ण वर्णन गीतेत आहे. हा अत्यंत महत्त्वाचा भाग पुढे येणार हे जाणून ज्ञानदेवांनी योजलेले संवाद ऐकावे असे आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, ‘मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवतात, ते या परमपदाला प्राप्त होतात. म्हणून पार्था, आणखी एकवार त्याबद्दल तुला सांगतो.’ इथे ज्ञानदेव श्रीकृष्णांचे चित्र ‘एक आदर्श गुरू’ म्हणून रेखाटतात. चांगला गुरू हा शिष्याला महत्त्वाचे ज्ञान केवळ एकदा देऊन गप्प राहात नाही; ते पुन्हा पुन्हा देतात. अर्जुनाच्या तोंडी ज्ञानदेवांनी दिलेलं वचन पुढे आहे- ‘हे गुरो, मी आपणास आता हेच विचारणार होतो, आपण मजवर कृपा केलीत.’

‘तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी। हेंचि म्हणावया होतों पां मी। तंव सहजें कृपा केली तुम्हीं। तरी बोलिजो कां।।

‘तर आता सांगण्यास सुरुवात करावी. परंतु काय सांगायचे ते अगदी सोप्या रीतीनं सांगा.’ या संवादातून अर्जुनाची ज्ञानाची आस दाखवली आहे, तसेच त्या दोघांमधील मोकळीकसुद्धा. म्हणून तो गुरूंना न कचरता सोप्या रीतीने सांगा, असे म्हणू शकतो. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, ‘तुला का आम्ही ओळखत नाही? तुला संक्षेपानं सांगतो. तर मग मनाची बाहेर हिंडण्याची स्वाभाविक सवय सोडून ते हृदयातच स्थिर राहील असे कर...’

ज्ञानदेवांच्या या सुरस संवादयोजनेतून काय साधते? संवाद साधण्याचा मंत्र सापडतो, मनाच्या मशागतीचा मार्ग आकळतो, गुरू-शिष्य नात्याचा आदर्श उमगतो. या नात्यातील खुलेपणा मनाला भावतो. जवळचे नाते असे असावे हे आज मानसशास्त्र सांगते. ज्ञानदेवांनी हे पूर्वीच सांगून ठेवले आहे; तेही इतक्या सुंदर प्रकारे! म्हणूनच ते ‘ज्ञान’देव!