छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील चार लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत अडीचशे कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्यात जवळपास २२ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील एकूण चार लाख सहा हजार ८२१ ग्राहकांकडे २५० कोटी १० लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात एक लाख सहा हजार २८८ ग्राहकांकडे ५२ कोटी ७४ लाख रुपये, ग्रामीण मंडळात एक लाख ७४ हजार ३२१ ग्राहकांकडे ५७ कोटी ४८ लाख रुपये व जालना मंडळातील एक लाख २६ हजार २१२ ग्राहकांकडे १३९ कोटी ८८ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. बिल भरण्यास प्रतिसाद देत नसलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडळातील ४८६१, ग्रामीण मंडळातील ८८१३ व जालना मंडळातील ७६८७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशीदेखील ही मोहीम सुरू राहणार आहे, असे महावितरणने कळवले आहे.
दरम्यान, महावितरणने थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये तर थ्री फेजजोडणीसाठी ५२० रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जात आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर काहीजण शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतात. परंतु हे बेकायदेशीर असून असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.









