नाठाळांचे माथी हाणावी काठी!

Contributed byसंपत थेटे|महाराष्ट्र टाइम्स

त्र्यंबकेश्वरसारख्या धार्मिक स्थळांवर भाविकांना होणारा त्रास आणि मारहाण चिंताजनक आहे. दर्शन व्यवस्थेतील गैरप्रकार आणि त्यामागील आर्थिक हितसंबंध उघड झाले आहेत. सुविधांअभावी भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या समस्यांवर माध्यमांनी वेळोवेळी प्रकाश टाकला आहे, तरीही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

नाठाळांचे माथी हाणावी काठी!
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी विठ्ठलाशी नव्हे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी वाद असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. पंढरपूरच्या बडव्यांनीही यावर आक्षेप घेतला होता. राज ठाकरेंच्या विधानात राजकीय संदर्भ असले तरी, आजकाल अनेक मंदिरांमध्ये भाविकांचीही अशीच भावना दिसून येते. त्र्यंबकेश्वरमध्ये नुकतीच एका भाविकाला मारहाण झाल्याची घटना हे याचेच उदाहरण आहे. धार्मिक स्थळांवर वाद होणे नवीन नाही, पण ज्यांच्यामुळे मंदिरांचे महत्त्व वाढते आणि अर्थकारण चालते, त्या भाविकांनाच मारहाण केली जात असेल, तर हे गंभीर आहे. अशा लोकांचे धाडस का वाढत आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. खरं तर, देवाची मूर्ती डोळ्यात साठवण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांचाही आदर व्हायला हवा. पण प्रत्यक्षात याच्या उलट घडते.

सिंहस्थ कुंभमेळ्याला काही महिने बाकी असताना, त्र्यंबकेश्वराची दर्शन व्यवस्था मारामारी आणि गैरसोयींमुळे चर्चेत आहे. भाविकांना दर्शनासाठी चार-पाच तास रांगेत उभे राहावे लागते. सुविधा नसल्यामुळे रांगेतील गर्दीत गुदमरल्यासारखे होते. गर्भगृहात पोहोचण्यापूर्वीच सुरक्षारक्षक त्यांना बाजूला करतात. या रेटारेटीत एखाद्याचा संयम सुटला की वाद होतो. मग महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) आणि मंदिराचे सुरक्षारक्षक भाविकांवर तुटून पडतात. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय करणे वेगळे, पण भावनेच्या भरात चूक करणाऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणे, हा कोणता कायदा आहे? नवीन वर्षात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी मारहाणीच्या घटना वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. पण ही सुधारणा कोण आणि का करेल, हा प्रश्न आहे.
दोनशे रुपयांचे 'पेड दर्शन' घेणाऱ्यांची अवस्था तर 'हात दाखवून अवलक्षण' अशी होते. कमी पैसे देणाऱ्यांना उंबऱ्यावर डोके टेकवू दिले जाते. जास्त पैसे दिल्यास खडीसाखरेचा प्रसाद आणि नारळही मिळतो. दर्शन घडवून आणणाऱ्या या टोळ्या सक्रिय आहेत. गंध लावणारे, विश्वस्त आणि पुजारी यांच्यापर्यंत त्यांचे संबंध असल्याचे आरोप होतात. या साखळीतील प्रत्येक व्यक्तीची रोजची कमाई गर्दीनुसार एक हजार ते लाख रुपयांपर्यंत असू शकते. 'मटा'सह अनेक माध्यमांनी भाविकांना लुटणाऱ्या या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. बातम्या प्रसिद्ध झाल्यावर त्रुटी दूर केल्याचा दावा केला जातो, पण काही दिवसांनी पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' अशी स्थिती होते. दर्शन व्यवस्थेत अचानक बदल केले जातात, ज्यात लांबून येणारे भाविक भरडले जातात. दर्शन व्यवस्थेत सुसूत्रता आल्यास आपली 'दुकाने' बंद होतील, या भीतीने हे लोक सुधारणांना विरोध करतात. अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, पार्किंगची जागा नसणे यांसारख्या समस्या तर देव स्वतः अवतरला तरी सुटणे कठीण आहे.

तिरुपती आणि शिर्डीनंतर श्रीमंतीच्या यादीत येणाऱ्या अनेक मंदिरांमध्ये दुर्दैवाने हेच चित्र कमी-अधिक प्रमाणात दिसते. धार्मिक स्थळांचे अर्थकारण जोरात असले तरी, सुविधांच्या नावाखाली काहीच नसते. श्रद्धेच्या बाजारातही मधली साखळीच जास्त नफा कमावते. भाविकांच्या 'देखल्या देवाला दंडवत' या वृत्तीचा फायदा घेतला जातो. स्थानिक पुढाऱ्यांच्या सहभागाशिवाय यंत्रणा भाविकांशी हातघाई करण्याची हिंमत दाखवू शकत नाही. संतश्रेष्ठ तुकोबा महाराज म्हणतात, 'नाठाळांच्या माथी हाणावी काठी'. पण प्रश्न हा आहे की, जे देवाच्या काठीचीही पर्वा करत नाहीत, ते या काठीला तरी घाबरतील का?