‘बीओटी’ प्रकल्पाला पालिकेची पुन्हा चाल

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात बीओटी प्रकल्पाला पुन्हा चालना मिळाली आहे. यातून ११२ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. मोकळ्या जागांवर सिंहस्थासाठी 'टेन्ट सिटी' उभारण्याचेही प्रस्तावित आहे. पशुवैद्यकीय विभागासाठी १२.९८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ४०.४५ कोटींची तरतूद आहे. कुंभमेळ्यानंतर साधुग्राम येथील इमारतीत मध्यवर्ती औषध भांडार आणि नेत्र रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे.

‘बीओटी’ प्रकल्पाला पालिकेची पुन्हा चाल
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

नाशिक महापालिकेच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात भाजपच्या गत सत्ताकाळातील वादग्रस्त ‘बीओटी’ प्रकल्पाला आयुक्त मनीषा खत्री यांनी पुन्हा चाल दिली. अंदाजपत्रकात बीओटीतून (बांधा वापरा व हस्तांतरित करा) ११२ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. कोणत्या मिळकती बीओटीवर दिल्या जाणार हे स्पष्ट नसले तरी, स्पष्ट धोरण तयार करून मिळकती बीओटीवर दिल्या जातील, असे स्पष्टीकरण आयुक्त खत्री यांनी दिले. मोकळ्या जागांवर सिंहस्थात ‘टेन्ट सिटी’ उभारण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या सत्ताकाळात आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे कारण देत; तसेच उत्पन्नवाढीचा संकल्प सोडत मनपाच्या मोक्याच्या २२ मिळकती खासगी विकसकांना बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातला होता. त्यात बदल करून २२ पैकी ११ मिळकती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने विरोध केल्यानंतर प्रस्ताव बारगळला होता.

‘पशुवैद्यकीय’साठी तरतूद

यंदा पशुवैद्यकीय विभागासाठी १२.९८ कोटींची तरतूद करण्यात आली. विभागाच्या दवाखान्यासाठी पाच कोटी, निर्बीजीकरण केंद्रासाठी ५ कोटी, कत्तलखान्यांसाठी ‘इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट’साठी १.५ कोटी, इमारत बांधणी, भिंतीसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सिंहस्थासाठी साधुग्राम येथे उभारण्यात येणाऱ्या दवाखान्यासाठी अस्तित्वातील इमारतीचे आधुनिकीकरण व पहिल्या मजल्यावरील बांधकाम केले जात आहे. कुंभमेळ्यानंतर या इमारतीत तळ मजल्यावर अत्याधुनिक मध्यवर्ती औषध भांडार व पहिल्या मजल्यावर सुसज्ज नेत्र रुग्णालय सुरू करण्याचा मानस आयुक्त खत्री यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ४०.४५ कोटींची तरतूद करण्यात आली.