ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि राज्यसभेचे माजी खासदार म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर कवठा येथे अंत्यसंस्कार केले जातील.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरु, लातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, राज्यसभेचे माजी खासदार डॉ. जनार्दन तथा जे. एम. वाघमारे (वय ९२) यांचे सोमवारी सकाळी साडेआठला येथील राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कवठा (ता. औसा) या मूळ गावी शेतात मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, सोमवारी दिवसभर अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वाधिक विद्यार्थी यशस्वी होण्याचा विक्रम करणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य असताना डॉ. वाघमारे यांनी शिक्षणक्षेत्रात नवा ‘शाहू पॅटर्न’ निर्माण केला होता. त्यांचा व्यासंग, चिंतन, सामाजिक विषयांचे सखोल ज्ञान आणि विश् लेषण करण्याची वेगळी हातोटी होती. त्यामुळे त्यांची ख्याती ‘विचारवंत प्राचार्य’ अशी निर्माण झाली होती. १९८०च्या दशकात तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचे आंदोलन झाले आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यात आले. त्याच वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नांदेड येथे स्वतंत्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करून त्याचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ. जनार्दन वाघमारे यांची नियुक्ती केली होती. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयानंतर वाघमारे यांनी, शरद पवार आणि सर्व काँग्रेस विरोधकांतर्फे मुख्यमंत्र्यांच्या गावात काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस मतांनी पराभूत केले होते. शरद पवार यांनी त्यांना राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली.