जिल्ह्यातील कोट्यवधीची निर्यात ठप्प

Contributed byनाशिक कस्टम ब्रोकर्स असोसिएशन,अध्यक्ष|महाराष्ट्र टाइम्स

मध्य पूर्वेतील युद्धामुळे आखाती देशांना होणारी कोट्यवधींची निर्यात थांबली आहे. जळगावची केळी आणि नाशिकची द्राक्षे यांसारख्या कृषी उत्पादनांची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. हवाई आणि जलवाहतूक बंद असल्याने माल अडकून पडला आहे. आखाती देश अनेक वस्तूंसाठी भारतावर अवलंबून असल्याने तिथे तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील कोट्यवधीची निर्यात ठप्प
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जिल्ह्यातून आखाती देशांत सुरू असलेली कोट्यवधीची निर्यात ठप्प झाली. जिल्ह्यातून चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत या देशांमध्ये ३,१०३ कोटींची निर्यात झाली असून, रविवारपासून अनिश्चित काळासाठी निर्यात बंद झाल्याने कोट्यवधीचा फटका बसण्याची भीती आहे.

जिल्ह्यातून संयुक्त अरब अमिरात, इराक, सौदी अरब, कतार, कुवेत, इराण, बहरीन, इस्रायल या देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्यात कांदा, केळी, द्राक्षे, हिरवी मिरची, आंबे, टोमॅटो, भाजीपाला या कृषी उत्पादनांसह स्मार्टफोन, औद्योगिक वापराचे बोर्ड, पॅनल आदी वस्तूंचा समावेश असतो. गेल्या एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातून या देशांना ३,१०३ कोटींची निर्यात करण्यात आली आहे. त्यापैकी दुबईत सर्वाधिक १,८२९ कोटींची निर्यात झाली आहे. मात्र, दोन दिवसांपासून मध्य पूर्वेतील युद्धामुळे आखाती देशांकडे जाणारी हवाई व जलवाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे, तर हवाई मार्गाने जाणारी खोकी नाशिक व मुंबई विमानतळावर अडकून पडली आहेत. नाशिक विमानतळावरून आखाती देशांत दरमहा सुमारे पंचवीस कार्गो विमाने जातात. ही वाहतूक तूर्त थांबवण्यात आली आहे. आखाती देश अनेक बाबींसाठी भारतावर अवलंबून असून, जिल्ह्यातून विशेषत: जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. मात्र, वाहतूक थांबवण्यात आल्याने तेथे या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले.

जळगाव : युद्धजन्य परिस्थितीचा फटका महाराष्ट्रातील शेतीला बसला असून, आखाती देशांत होणारी फळांची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेषतः जळगावची केळी आणि नाशिकच्या द्राक्षाची रवानगी थांबल्याने निर्यातदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. भारतातून आखाती देशात होणारी केळीची दररोजची सुमारे २५ कोटींची उलाढाल आता पूर्णपणे थांबली आहे. सविस्तर वृत्त...३