मेळघाट परिसरात ‘हाय अलर्ट’

महाराष्ट्र टाइम्स

मेळघाट परिसरात होळीच्या काळात शिकारी आणि वणव्याचा धोका वाढला आहे. वन विभागाने हाय अलर्ट जारी केला असून, २४ तास गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः बहेलिया टोळीचा धोका लक्षात घेतला जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. स्थानिक पोलीस आणि ग्राम संरक्षण समित्यांशी समन्वय साधून संयुक्त कारवाई केली जाईल.

मेळघाट परिसरात ‘हाय अलर्ट’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

होळीच्या काळात मेळघाटात शिकारी व वनाग्नीचा धोका लक्षात घेऊन वन विभागाने ‘ हाय अलर्ट ’ जारी केला आहे. सर्व रेंज, बीट आणि संवेदनशील वनक्षेत्रांमध्ये २४ तास गस्त करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

होळीच्या काळात जंगल परिसरात मानवी वर्दळ वाढते. काही ठिकाणी शिकार, सापळे लावणे किंवा लाकूडतोडीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: शेजारच्या मध्य प्रदेशातून सक्रिय होणाऱ्या बहेलिया टोळीचा धोका लक्षात घेऊन सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. वन्यजीवांचे संवेदनशील अधिवास, पाणवठे आणि गावालगतची वनक्षेत्रे यांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, मोबाइल पथक, एसटीपीएफ आणि भरारी पथके सक्रिय ठेवून अचानक तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती व वाहनांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी आणि विभागीय वनाधिकारी डॉ. मयूर भैलुमे यांनी दिले.

मेळघाटात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कोरडे गवत, वाढते तापमान आणि मानवी निष्काळजीपणा यांमुळे वणव्याचा धोका तीव्र झाला आहे. होळीच्या सणादरम्यान बेफिकीरपणे टाकलेली जळती काडीही मोठ्या आगीस कारणीभूत ठरू शकते. वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी हा कठोर पवित्रा घेतला असून, मेळघाटात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वन विभागाने दिला आहे. मेळघाटात सध्या उत्सवापेक्षा सतर्कतेलाच प्राधान्य देण्यात आले आहे.

‘वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये कोणत्याही वन गुन्ह्यावर कठोर कारवाई केली जाईल,’ असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. स्थानिक पोलिस व ग्राम संरक्षण समित्यांशी समन्वय साधून संयुक्त कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे. पीसीसीएफ यांच्या संदेशात पुढील दोन ते तीन दिवस सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व सहायक वनसंरक्षक यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. अधिकारी क्षेत्रात राहिल्यास कर्मचारीही कॅम्प व वसाहतीत उपस्थित राहतील, असा संदेश देण्यात आला आहे. गस्तीचा सविस्तर आराखडा तयार करून नियोजनबद्ध मार्गक्रमण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘होळीच्या सणात जंगल परिसरात मानवी हालचाली वाढतात. या काळात वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी काही टोळ्या सज्ज होण्याची शक्यता असते. विशेषत: शेजारील मध्यप्रदेशातून बहेलिया टोळी सक्रिय होण्याचा धोका असतो. गेल्या काही वर्षांत या कालावधीत गंभीर गैरप्रकार घडलेले नसले, तरी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वन विभागाकडून कमतरता न ठेवता करडी नजर ठेवली जाते,’ असे विभागीय वनाधिकारी डॉ. मयूर भैलुमे यांनी स्पष्ट केले.