पहिला हादरा सकाळी ७ वाजता बसला तेव्हा आम्ही गावातील लोक धावत गेलो. स्फोट झाल्यानंतर अग्निशमन विभागाची गाडी उशिरा आली. त्यामुळे अपघाताची तीव्रता अधिक वाढली. औद्योगिक स्फोटके आणि डिटोनेटर्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीत अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका तैनात असायला हवी. कामगारांच्या सुरक्षेच्या हमीचा प्राधान्याने विचार व्हायला हवा होता. ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर कंपनीनेही उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले होते. मात्र, यंत्रणा बसविण्यापूर्वीच स्फोट झाला, असेही गावकरी म्हणाले.
काटोल तालुक्यातील कोतवाल बर्डी गावावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी यंदा होळी न साजरी करण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. गावालगत असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गावातीलच कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. ‘आमच्या ओळखीतील कामगार गेले. आयुष्याची राखरांगोळी झाली असताना रंग कसे खेळायचे’, असे म्हणत ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
महसुलीदृष्ट्या काटोल तालुक्यात व कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोतवाल बर्डी परिसरातील राऊळगावनजीकच्या या दुर्घटनेत आतापर्यंत १९ कामगारांचा मृत्यू, तर २३ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असून चौकशीचे फेरेही चालू आहेत. भविष्यात अशा घटना टाळाव्यात, यासाठी उपाययोजना व दोषींवर कारवाईची प्रक्रिया होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. ‘आम्ही जे गमावले, ते परत येणार नाही. प्रत्येक घरात शोक आहे’, अशी भावना सरपंच कैलाश महाकुलकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे यंदा रंग न उधळता दिवंगत कामगारांना श्रद्धांजली अर्पण करून शांततेत दिवस घालवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.









