बोईसरमध्ये वायुगळती;कामगारांना श्वसन त्रास

महाराष्ट्र टाइम्स

बोईसरमधील भगेरिया केमिकल कंपनीत ओलियम वायूची गळती झाली. यामुळे परिसरातील कामगार आणि नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला. वायूगळतीची व्याप्ती वाढण्याची भीती असल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. शाळा आणि कार्यालये रिकामी करण्यात आली. डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे असे त्रास जाणवले. परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत.

बोईसरमध्ये वायुगळती;कामगारांना श्वसन त्रास
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या बोईसर येथील भगेरिया केमिकल (पूर्वाश्रमीची झेनित केमिकल) या रासायनिक कंपनीमध्ये ओलियम वायूची गळती झाल्याने परिसरातील कामगारांसह नागरिकांना श्वसनाचा प्रचंड त्रास जाणवू लागला. वायुगळतीची व्याप्ती दूरपर्यंत पसरण्याची भीती असल्याने परिसरातील कारखान्यांमधून कामगारांना, तसेच निवासी भागातील नागरिक, विद्यार्थ्यांना तातडीने परिसराबाहेर सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले. वायुगळतीची ही गेल्या आठवड्यातली दुसरी घटना आहे.

भगेरिया कंपनीमध्ये सुमारे एक टनाहून अधिक ओलियम वायूची गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. टाकी नाका ते कॅम्लीन नाका दरम्यानच्या परिसरातील उद्योग व रहिवासी भागाला या वायुगळतीची तीव्रता अधिक जाणवली. वायुगळतीमुळे कामगारांची पळापळ सुरू झाली. कारखान्यातून पांढऱ्या वायूचे लोट हवेत पसरताना नागरिकांना दिसले. संभाव्य धोका ओळखून परिसरातील शाळा व कार्यालये रिकामी करण्यात आली. अद्याप कोणालाही गंभीर त्रास झाल्याचे आढळलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोईसर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया कंपनीतील ओलियमचा साठा असलेल्या टाक्यांमधून सोमवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास वायुगळती सुरू झाली. विशेष म्हणजे सोमवारी दुपारच्या वेळेला समुद्राला भरती असल्याने वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने सल्फरडाय ऑक्साइड व इतर सल्फर ऑक्साइडची निर्मिती होऊन परिसरातील कामगारांना त्रास होऊ लागला. डोळ्यांना चुरचुरणे, डोळे लाल होणे, तसेच श्वसनाचा आणि घशाला कोरड पडून खवखव होत असल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.