ओलियम वायूगळतीचा कामगारांना त्रास

महाराष्ट्र टाइम्स

पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये भघेरिया केमिकल कंपनीतून ओलियम वायूची गळती झाली. यामुळे परिसरातील कामगार आणि नागरिकांना त्रास झाला. प्रशासनाने तातडीने कारवाई करत लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वायू गळतीमुळे पांढरे ढग तयार झाले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

olium gas leak causes chaos in boisar industrial estate
पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक वसाहतीत भघेरिया केमिकल कंपनीतून ओलियम वायूची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या वायूमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने त्यांना आणि कारखान्यांमधील कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत आपत्कालीन यंत्रणांना सतर्क केले आणि परिसरातील रस्ते बंद केले.

भघेरिया केमिकल (पूर्वीची झेनित केमिकल) या कंपनीतून हा ओलियम वायू हवेच्या संपर्कात आल्याने सल्फर डायऑक्साइडसारखे विषारी वायू तयार झाले. यामुळे बोईसर परिसरात पांढऱ्या रंगाचे ढग पसरले होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, कंपनीतून एक टनाहून अधिक ओलियम वायूची गळती झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने महसूल आणि इतर यंत्रणांना तातडीने कामाला लावले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजू असावे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सतीश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि त्या भागात जाण्यास मनाई केली. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या होत्या. या वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास सुरू झाले होते.