मुंबई येथील जवाहरलाल नेहरु पोर्ट (जेएनपीटी) बंदरावर नाशिकसह महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांचा १५० हून अधिक कंटेनरमध्ये भरलेला कांदा निर्यातीअभावी अडकून पडला आहे. हा कांदा प्रामुख्याने दुबईमार्गे आखाती देशांत निर्यात केला जातो. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईचे मार्केट रविवारपासून (दि. १) पूर्णपणे ठप्प झाले आहे.
दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने हजारो टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. निर्यात कधी सुरू होणार, दुबई मार्केट कधी उघडणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोसळलेले कांद्याचे बाजारभाव, उत्पादन खर्चात झालेली वाढ व निर्यात धोरणातील अनिश्चितता या स्थितीत युद्धाची भर पडल्याने कांदा उत्पादकांसह निर्यातदारांची झोप उडाली आहे. निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारात भाव कोसळण्याची, तर दुसरीकडे कंटेनरमध्ये दीर्घकाळी राहिल्यास माल खराब होण्याचा धोका आहे.









