बाजाराला तेलाचे चटके

महाराष्ट्र टाइम्स

पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक टक्क्याहून अधिक घट नोंदवली गेली. गुंतवणूकदारांच्या हतबलतेमुळे बाजारात नकारात्मक कल दिसून आला. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठी विक्री केली. आज, मंगळवारी होळीमुळे शेअर बाजार बंद राहणार आहेत.

बाजाराला तेलाचे चटके
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली, ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक टक्क्याहून अधिक घट झाली. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्वस्थता पसरली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचे घसरते मूल्य यामुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

पश्चिम आशियातील तणावामुळे ‘ब्रेंट क्रूड’ ८.३४ टक्क्यांनी वाढून ७८.९५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारांच्या घसरणीवर झाला. जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक कल आणि परकीय निधीचा ओघ बाहेर गेल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुरुवातीला २,७४३.४६ अंकांनी (३.३७ टक्क्यांनी) घसरून ७८,५४३.७३ पर्यंत खाली आला होता. मात्र, दिवसअखेर तो १,०४८.३४ अंकांच्या (१.२९ टक्के) घसरणीसह ८०,२३८.८५ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी व्यवहारादरम्यान ५७५.१५ अंकांनी (२.२८ टक्के) कोसळून २४,६०३.५० पर्यंत खाली आला होता. बाजार बंद होताना तो ३१२.९५ अंकांच्या (१.२४ टक्के) घसरणीसह २४,८६५.७० वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजारात सेवा क्षेत्र ३.८१ टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू २.३० टक्के, वाहनांचे सुटे भाग २.२३ टक्के, तेल आणि नैसर्गिक वायू २.१५ टक्के आणि वीज क्षेत्रातील समभाग २.०६ टक्क्यांनी घसरले. एकूण ३,५६१ शेअरमध्ये घसरण झाली, तर ८२१ शेअर वधारले. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७,५३६.३६ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली, तर देशांर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १२,२९२.८१ कोटी रुपयांची खरेदी केली. दरम्यान, होळीनिमित्त आज, मंगळवारी शेअर बाजार बंद राहणार आहेत.