The Demise Of The Prominent Figure Na Go Thute A Pillar Of The Zhadiboli Movement
ना. गो. थुटे यांचे निधन
महाराष्ट्र टाइम्स•
झाडीबोली चळवळीला बळ देणारे ज्येष्ठ साहित्यिक ना. गो. थुटे यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी वरोरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात शोक पसरला आहे. थुटे यांनी ५० हून अधिक साहित्यकृती लिहिल्या.
चंद्रपूर : झाडीबोली चळवळीला बळ देणारे ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि ‘झाडीबोली’चे अभ्यासक ना. गो. थुटे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी वरोरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी असून, त्यांच्या निधनाने झाडीपट्टीच्या साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ना. गो. थुटे यांचा जन्म १ मे १९३९ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी या छोट्या गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या थुटे यांनी ‘कविता’ या साहित्यप्रकारात विशेष प्राविण्य मिळवले होते. मात्र, ते इतर साहित्यप्रकारातही सहज वावरत असत. त्यांनी आपल्या लेखणीतून पन्नासहून अधिक साहित्यकृतींची निर्मिती केली. झाडीबोली चळवळीला त्यांनी आपल्या कार्यामुळे नवी दिशा दिली आणि तिला गतिमान केले.