पारंपरिक उच्च जातीय मतपेढीच्या पलीकडे जाऊन भाजपने २०२०-२०२५दरम्यान ‘महादलित’ आणि मागासलेल्या जातींना आकर्षित करण्यासाठी विविध स्तरांतील नेत्यांना पुढे आणले आणि त्याद्वारे आपला जनाधार वाढवला. मोदी फॅक्टर आणि हिंदुत्वाची सांगड पक्षाने २०१४पासून घातली. बिहारच्या जातीय राजकारणात आपले स्थान मजबूत करण्यासाठी मोदींचा चेहरा आणि हिंदुत्ववादी अजेंड्याचा भाजपने वेळोवेळी वापर केला. अलीकडे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना बिहारमध्ये पाठवल्यावर बूथ स्तरावरील भाजपची संघटनात्मक यंत्रणा मजबूत झाली. दुसरीकडे, ‘आमच्या युतीला निवडून दिले नाही तर पुन्हा ‘जंगलराज’ येईल’, अशी भीती घालून भाजपने राज्यात आपली पोलादी पकड प्रस्थापित केली.








